Shravani Somavar Date & Puja Vidhi: यंदा श्रावण महिन्याचा आरंभ लवकर होत आहे. 21 जुलै रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यात अनेक व्रत वैकल्य, सणवार असतात. नागपंचमी, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा, कृष्ण जयंती अशा विविध सणांचा आनंद घेऊन श्रावण मास येतो. याशिवाय श्रावणी सोमवाराचे शंकराचे व्रत, मंगळागौरीचे व्रत, जिवंतिका पूजन अशी व्रत वैकल्य यांची रेलचेल असते. हिंदू धर्मियांसाठी पवित्र असणारा हा महिना भगवान शंकराला अतिशय प्रिय असल्याचे मानले जाते. त्यामुळे श्रावणी सोमवारी करण्यात येणाऱ्या शंकराच्या व्रताचे महत्त्व मोठे आहे. शिवभक्तांसाठी श्रावण महिन्यातील सोमवार अतिशय खास असतो. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शंकराची पूजा, मंत्रपठण, उपवास भाविक करतात. यंदा पहिला श्रावणी सोमवार 27 जुलै रोजी असून चार सोमवार व्रतासाठी आहेत.
समुद्रमंथनातून बाहेर पडलेले हलाहल विष भगवान शंकराने प्राशन केले आणि मनुष्य जातीवरील धोका टाळला. त्यामुळे भगवान शंकराचे मनुष्यावर असलेले हे ऋण फेडण्यासाठी श्रावणी सोमवारी पूजा, उपवास करून त्याच्याप्रती आदर व्यक्त केला जातो. तसंच पौराणिक कथांनुसार पार्वतीनेही श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करुन महादेवाला प्रसन्न केले आणि विवाह केला. त्यामुळे इच्छित वर प्राप्तीसाठी देखील कुमारिका श्रावणी सोमवारचे व्रत करतात.
श्रावणी सोमवार तारीख आणि शिवमूठ:
पहिला श्रावणी सोमवार 27 जुलै 2020 |
तांदूळ |
दुसरा श्रावणी सोमवार 3 ऑगस्ट 2020 |
तीळ |
तिसरा श्रावणी सोमवार 10 ऑगस्ट 2020 |
मूग |
चौथा श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2020 |
जव |
श्रावणी सोमवार पूजा विधी:
महाराष्ट्रात श्रावणी सोमवारी शंकराच्या मंदिरात जावून भगवान शंकराच्या पिंडीवर पाणी, दूध यांनी अभिषेक करावा. त्यानंतर बेल, सफेद फुल वाहावे. तसेच श्रावणी सोमवारी एका विशिष्ट धान्याचं मूठभर दान करण्याची प्रथा आहे. त्यास 'शिवमूठ' असे म्हणतात. शिवमूठ वाहून झाल्यावर दिवा, अगरबत्ती लावून प्रार्थना करावी. तसंच शंकराची पूजा शुभ्र वस्त्र परिधान करुन करण्याची परंपरा आहे.
मात्र यंदा कोरोना व्हायरस संकाटाच्या पार्श्वभूमीवर देवळात जावून पूजा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे घराच्या घरी पूजा करुन भगवान शंकराची आराधना तुम्ही नक्कीच करु शकता.