Shirdi Sai Baba Punyatithi 2020 Utsav: श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणाऱ्या साई बाबा (Sai Baba) यांची पुण्यतिथी दसऱ्याच्या दिवशी साजरी केली जाते. त्यास साई बाबा 'महासमाधी दिवस' असेही म्हटले जाते. यंदा साई बाबांची पुण्यतिथी (Sai Baba Punyatithi) रविवार, 25 ऑक्टोबर रोजी आहे. साईबाबांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी चार दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर (Coronavirus Pandemic) हा कार्यक्रम तीन दिवसांचा असेल. 24 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत हा कार्यक्रम पार पडेल. दरवर्षी साई बाबांची पुण्यतिथी आणि दसरा हा योग साधत साई भक्त शिर्डीला गर्दी करतात. मात्र यंदा कोविड-19 संकटामुळे राज्यातील मंदिरं अद्याप भाविकांसाठी खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे साईसमाधीच्या दर्शनाला भक्तांना मुकावे लागणार आहे. दरम्यान, पुण्यतिथीचा कार्यक्रम नियमांचे पालन करुन साजरा करण्यात येईल.
यंदा साई बाबांची 102 वी पुण्यतिथी आहे. दरवर्षी पुण्यतिथी निमित्त चार दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यात पूजा, भजन, सामुहिक पारायण, पालखी, रथ यात्रा यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे एक दिवस समाधी मंदिर रात्रभर खुलं असतं. त्यावेळेस भजन, कव्वाली गायली जाते. यंदा तीन दिवसांच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात साई बाबांची काकड आरती, पोथी चित्रण प्रक्रीया, द्वारकामाई साई सतचरित्र अखंड पारायण, रथ यात्रा यांसारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांचा सहभाग आहे.
साई बाबा पुण्यतिथी कार्यक्रम:
24 ऑक्टोबर- पालखी
25 ऑक्टोबर- रथ
26 ऑक्टोबर- कार्यक्रमाचा समारोप
साईबाबांचा जन्म 27 सप्टेंबर 1830 रोजी महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात झाला. त्याचे वडील परशुराम शुसरी यांना गोविंद भाऊ आणि आई अनुसूया यांना देवकी अम्मा असे संबोधले जात असे. 15 ऑक्टोबर 1918 रोजी साईबाबांनी शिर्डी येथे समाधी घेतली. दरम्यान, यंदा कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर साई बाबा मंदिरातील गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात येणारा उत्सवही साधे पणाने साजरा करण्यात आला होता. विशेष म्हणजे भक्तांशिवाय पार पडलेल्या या सोहळ्यात रथ व पालखी मिरवणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.