Shattila Ekadashi 2020: षट्तिला एकादशी साजरी करण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या महत्व आणि शुभ मुहूर्त
Lord Vishnu (Photo Credit - Facebook)

Shattila Ekadashi 2020: वारकरी समाजामध्ये एकादशीच्या (Ekadashi) व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे. आज (20 जानेवारी) संपूर्ण राज्यात षट्तिला एकादशी (Shattila Ekadashi 2020) साजरी होत आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व असते. या दिवशी पाण्यात तीळ टाकून स्नान केल्यास तसेच तिळाचे उटणे लावल्यास आणि तिळाचे दान केल्यास सर्व पापांचा नाश होतो, असंही म्हटलं जातं.

षट्तिला एकादशीचा प्रारंभ सोमवारी (20 जानेवारी) मध्यरात्री 2 वाजून 51 मिनिटांनी झाला असून मंगळवारी (21 जानेवारी) मध्यरात्री 2 वाजून 5 मिनिटांनी या एकादशीची समाप्ती होणार आहे. षट्तिला एकादशीला तिळ वापरून विष्णूंची पूजा अर्चना केल्याने मनोकामना पूर्ण होतात. या एकादशीला तीळ वापरून स्नान, नैवेद्य, दान, तरपण करण्याची परंपरा आहे. या दिवशी तीळ वापरल्याने पुण्य प्राप्ती होते आणि मनातील इच्छा देखील पूर्ण होतात. पौराणिक कथेनुसार, या दिवशी अधिकाधिक तिळाचा वापर केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होतं. तिळाच्या 6 प्रकारामुळे ही एकादशी 'षट्तिला एकादशी' म्हणून ओळखली जाते. तीळ स्नान, तीळ उटणे, तीळ हवन, तीळ तरपण, तीळ भोजन, तीळ दान हे तिळाचे 6 प्रकार आहे. (हेही वाचा - Haldi Kunku Rangoli Designs: हळदी कुंकू कार्यक्रमा दिवशी पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी आकर्षक आणि सोप्या रांगोळ्या!)

या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. तसेच पूर्व दिशेला तोंड करून 5 मूठ तिळांनी 108 वेळा ॐ नमो भगवते वासुदेवाय मंत्राने आहुती द्या. योग्य विद्वान व्यक्ती किंवा ब्राह्मणाच्या सल्ल्याने दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांना तिळाने तरपण करा. या दिवशी अन्न सेवन करू नये. संध्याकाळी भगवान विष्णुला तिळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा. या दिवशी तिळाचे पदार्थ गरजू व्यक्तीला दान केल्याने लाभ होतो.