आपल्या लाडक्या गणरायाला प्रसन्न करण्यासाठी संकष्टी चतुर्थीचे (Sankashti Chaturthi 2020) व्रत करणे हे खरच खूप शुभ आणि लाभदायक मानले जाते. दर महिन्याला पौर्णिमेनंतर येणाचाया चतुर्थीला 'संकष्टी चतुर्थी' म्हणतात. आपल्या आयुष्यातील विघ्न दूर व्हावी किंवा काही अनिष्ट घडू नये यासाठी श्रीगणेशाचा धावा करण्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात. असे म्हणतात, हे व्रत मनोभावे केल्यास विघ्नहर्ता गणेशा आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्यावर काही संकट आले असेल तर ते दूर करतो. आजची संकष्टी चतुर्थी ही 2020 या नववर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थी म्हणजे आपले मागणे देवापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम नववर्षातील ही पहिली संकष्टी असल्यामुळे त्याचे महत्त्वही तितकेच खास आहे. आज अनेक लोक गणपतीची आराधना करतात. त्याच्यासाठी उपवास करतील.
संकष्टी चंद्रोदयाची वेळ:
संकष्टी चतुर्थी दिवशी चंद्र दर्शन शुभ मानलं जातं. त्यामुळे दिवसभराचा उपवास हा चंद्रोदयानंतर सोडला जातो. असं केल्याने मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. आज पंचांगानुसार, रात्री 9.03 मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ सांगण्यात आली आहे.
कसे कराल या दिवशी व्रत:
संकष्टचतुर्थीचे व्रत करणाराने त्यादिवशी पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी. दिवसभर गणेश चिंतन करुन उपवास करावा. आवश्यकतेनुसार उपवासास चालणारे पदार्थ खावे. दिवसभर आपला उद्योग-धंदा करावा. आवश्यक वाटल्यास रात्री उपवास सोडण्याआधी पुन्हा आंघोळ करावी. नंतर स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर तांदूळ अथवा गव्हाची लहानशी रास करावी. त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवावा; कलशाभोवती दोन वस्त्रे गुंडाळावी, त्यावर ताम्हन ठेवून त्यात "श्रीसंकष्टहर गणपतीची" स्थापना करावी. ( श्रीगणपतीची सोने, चांदी,तांबे वगैरे धातूची मूर्ती किंवा फोटो) त्याची षोडोपचारे पूजा करावी. पूजा करणा-याने अंगावर लाल वस्त्र घ्यावे. पूजेत वाहायचे "गंध-अक्षता-फ़ूल-वस्त्र" तांबड्या रंगाचे असावे.
त्यानंतर संकष्ट चतुर्थी महात्म्य वाचावे. मग गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवून गणेशाची आरती करावी आणि गणेशासमोर नतमस्तक व्हावे. त्यानंतर चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन करुन चंद्राला गंध, पाणी, अक्षता, फुले वाहावी. तुम्ही उपवास सोडत असल्या कारणाने जेवणात गोड पदार्थ आणि मोदक असावेत. जेवण आटोपल्यानंतर उत्तर पूजा करुन गणेशाची मूर्ती किंवा फोटो उचलून ठेवावी. धान्य वापरात घ्यावे. पाणी तुळशीत ओतावे.
जाणून घ्या मकरसंक्रांतीचा मुहूर्त, पूजेचा विधी आणि सणाचे महत्त्व : Watch Video
आपल्या घरात आणि आपल्या आयुष्यात सुख-शांती कायम नांदावी यासाठी संकष्टीचे व्रत मनापासून केल्यास त्याचे नक्कीच लाभदायी फळ मिळते असे पुराणात म्हटले आहे.