साने गुरुजी (Sane Guruji) यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. आईच्या संस्कारांचा साने गुरुजींच्या जीवनावर फार मोठा प्रभाव होता. त्यातून त्यांनी आपली कारकीर्द घडवली. साने गुरुजींनी इंग्रजी साहित्यात एम. ए. ही उच्च पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून सहा वर्षे नोकरी केली. या ठिकाणी त्यांच्यातील शिक्षक अधिक प्रग्लभ झाला. यातूनच पुढे त्यांनी 'विद्यार्थी' हे मासिक सुरु केले. साने गुरुजींवर महात्मा गांधी यांच्या विचारांचा पगडा होता. त्यामुळे नोकरी सोडून त्यांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. 'काँग्रेस' नावाचे साप्ताहिक सुरु केले. त्याचबरोबर साने गुरुजी यांच्या देशभक्तीपर कविता फार प्रसिद्ध आहेत. साने गुरुजी यांची साहित्यसंपदा मोठी आहे. परंतु, 'श्यामची आई' ही त्यांची कादंबरी अत्यंत प्रसिद्ध झाली.
11 जून म्हणजे साने गुरुजी यांची पुण्यतिथी. 11 जून 1950 रोजी साने गुरुजी यांचे निधन झाले महात्मा गांधी यांच्या हत्येबरोबरच स्वातंत्र्यानंतरच्या अनेक मुद्द्यांमुळे ते अस्वस्थ झाले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असे सांगितले जाते. साने गुरुजी यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घेऊया त्यांचे काही मौल्यवान विचार... (Sane Guruji Death Anniversary: साने गुरुजींच्या आठवणींना उजाळा देतील त्यांनीच लिहिलेल्या या निवडक कविता)
# आपले मन म्हणजे एक महान जादुगार व चित्रकार आहे, मन म्हणजे ब्रह्म सृष्टीचे तत्त्व आहे.
# एका ध्येयाने बांधलेले कोठेही गेले तरी ते जवळच असतात.
# कला म्हणजे परमोच्च ऐक्य.
# कला म्हणजे सत्य, शिव आणि सौंदर्य यांचे संमेलन.
# कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे, पण पैसा हि आजची भाकर आहे.
# जगात कोणीही संपूर्ण स्वतंत्रपणे सर्व ज्ञान शोधून काढले आहे असे नाही.
# जिकडून जे घेता येईल, ज्यांच्यापासून जे शिकाता येईल ते आदराने घ्या.
# जे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकते, असत्य असते ते अदृश्य होते.
# ज्ञान म्हणजे ध्येयासाठी शून्य होणे, ज्ञान म्हणजे चर्चा नव्हे, वादही नव्हे आणि देह कुरवाळणे म्हणजे ज्ञानही नव्हे, ध्येयासाठी देह हसून फेकणे म्हणजे ज्ञान.
# सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फाच्या राशी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात.
साने गुरुजी यांच्या आठवणीत बांधले गेलेले 'साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक' हे रायगड मधील गोरेगाव येथे 36 एकरच्या परिसरात वसलेले आहे. या स्मारकाभोवती तिन्ही बाजुंना सुंदर डोंगररांगा आहेत. हे स्मारक मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाजवळ आहे. तर गोरेगाव रोड हे स्मारका जवळ असलेले रेल्वे स्थानक. स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत अशा साने गुरुजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!