Rajmata Jijabai Death Anniversary 2022 :छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन आणि पराक्रमाचे बाळकडू देणार्या राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी 17 जून रोजी आहे. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये सिंदखेडजवळील देऊळगाव येथे झाला होता. मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनदेखील त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. जिजामाता यांच्यावर अत्यंत कमी वयात कौटुंबिक जबाबदारी पडली होती. त्यांचा विवाह वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजी भोसले यांच्यासोबत झाला होता.
राजमाता जिजाऊ या जाधव घराण्यातील असून, सिंधखेडचे लखुजीराव जाधव यांच्या कन्या होत्या. जिजाऊ यांच्या आई म्हाळसाबाई या होत्या. जिजाऊंना लहानपणापासून कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे ऐकायला मिळत होते. विशेष म्हणजे ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. जिजाऊंची आई म्हाळसाईंनी त्यांना शूर वीरांच्या गोष्टी सांगून त्यांच्या साहसाला आणखी प्रोत्साहन दिले. जिजाबाईंनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. 1630 मध्ये शिवाजी महाराजांना जन्म दिला.
जिजाऊनी शिवरायांना राष्ट्रहितासाठी तयार केलं. जिजाऊ शिवाजी महाराज 14 वर्षांचे होते तेव्हा पुण्यात राहण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. त्यावेळी जिजाऊंनी दादोजी कोंडदेव यांच्यासोबत पुणे शहराचा पुनर्विकास केला. त्यांनी शिवरायांना प्रत्येक प्रसंगात योग्य मार्गदर्शन केले. जिजाऊ या शिवरायांच्या आद्यगुरू होत्या. शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सुवर्ण सोहळा पाहिल्यानंतर अवघ्या बारा दिवसांतचं इ.स 1674 मध्ये त्यांचे निधन झाले. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत जिजाऊंचा सिंहाचा वाटा होता.