यंदाची मुंबईमधील (Mumbai) लोकप्रिय माऊंट मेरी जत्रा (Mount Mary Fair) 10 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या काळात चर्चला भेट देणाऱ्या लोकांना सुविधा देण्यासाठी बीएमसीने तयारी सुरू केली आहे. बीएमसीने चर्चच्या जवळ असलेल्या पहिल्या 20 जागांचा लिलाव सुरू केला आहे, जेथे धार्मिक पुस्तके आणि धार्मिक सामग्री विक्रीसाठी तात्पुरते स्टॉल उभारले जातील. प्रत्येक स्टॉलची मूळ किंमत ₹ 97,000 पासून सुरू होते. पूर्वी, या 20 स्टॉल्सपैकी बरेचसे ₹ 1 लाखांहून अधिक किमतीमध्ये विकले गेले होते. या स्टॉल्समधून फक्त धार्मिक गोष्टीच विकल्या जातील.
बीएमसीच्या म्हणण्यानुसार, माउंट मेरी चर्चच्या परिसरात या 20 स्टॉल्सशिवाय इतर सुमारे 400 स्टॉल्स उभारले जातील आणि त्यांची आधारभूत किंमत 2250 पासून सुरू होईल. एक शतकाहून अधिक वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव सप्टेंबरच्या दुसऱ्या रविवारी सुरू होतो. यावेळी केवळ ख्रिश्चनच नव्हे तर सर्व धर्माचे लोक या कार्यक्रमाला गर्दी करतात. ही जत्रा मुंबईमधील सामाजिक आणि धार्मिक असे मोठे आकर्षण आहे.
माउंट मेरी जत्रा वांद्रे जत्रा म्हणूनही ओळखले जाते. याकाळात दररोज किमान एक लाख लोक चर्चला भेट देतात. गेल्या काही वर्षांत मेणबत्त्या, फुले, खाद्यपदार्थ, खेळणी आणि कृत्रिम दागिन्यांची विक्री करणारे तब्बल 430 स्टॉल या मेळ्यात लावण्यात आले आहेत. स्टॉल्ससाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना होत्या. त्यानुसार, बीएमसीला स्थानिक रहिवाशांसाठी 260 स्टॉल्स ठेवावे लागतील आणि उर्वरित स्टॉलसाठी बाहेरील लोकांना बोली लावण्याची परवानगी असेल. (हेही वाचा: अमेरिकेच्या जॉर्जिया राज्याने 'ऑक्टोबर'ला 'हिंदू वारसा महिना' म्हणून केले घोषित; जाणून घ्या काय आहे खास)
दरवर्षी, बीएमसीला या स्पर्धात्मक बोलीतून 30 लाखांपेक्षा जास्त महसूल मिळतो. बेस्टतर्फेही मेळ्यादरम्यान विशेष बसेस चालवल्या जातात. यंदा परिसरात खाद्यपदार्थ, फुले, फळांचे रस, मेणबत्त्या, सजावटीचे साहित्य, पुस्तकांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. दरम्यान, माउंट मेरी चर्च व्हर्जिन मेरीला समर्पित आहे. हे चर्च 1640 मध्ये बांधले गेले आणि नंतर 1761 मध्ये पाडले त्यानंतर त्याचे पुनःनिर्माण झाले.