आई (Mother) या शब्दाची फोड केली तर 'आ 'म्हणजे आत्मा आणि 'ई' म्हणजे ईश्वर, असा त्याचा अर्थ निघतो. असे म्हणतात की ईश्वर या जगात सर्वत्र येऊ शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली. आपल्या आईबद्दल आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मातृदिन (Mother’s Day 2022). अमेरिकेतील 28 वे राष्ट्राध्यक्ष थॉमस वूडरॉ विल्सन यांनी 8 मे 1914 रोजी मे महिन्यातील दुसरा रविवार अधिकृतपणे मातृदिन म्हणून जाहीर केला. तेव्हा पासून दरवर्षी मे महिन्यातील दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा केला जातो. यंदा 8 मे रोजी मातृदिन साजरा होणार आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये मातेचे स्थान अतिशय उच्च असल्याचे सांगण्यात आलेले आहे. माता ही आपली सर्वश्रेष्ठ गुरु मानली गेली आहे. दहा उपाध्यायांपेक्षा एक आचार्य श्रेष्ठ आहे, शंभर आचार्यांपेक्षा एक पिता श्रेष्ठ आहे आणि एक सहस्र पित्यांपेक्षा एक माता ही अधिक श्रेष्ठ आहे. मातेसारखी छाया नाही, मातेसारखे आश्रयस्थान नाही, मातेसारखे रक्षण नाही आणि मातेइतके प्रिय कुणीही नाही, तर अशाप्रकारे मातृदिनानिमित्त Images, HD Wallpaper, WhatsApp, Facebook Status, Messages, Wishes द्वारे काही प्रसिद्ध कोट्स शेअर करून व्यक्त करा आईबाबतची कृतज्ञता.
कौसल्येविण राम न झाला, देवकीपोटी कृष्ण जन्मला
शिवराजाचे चरित्र घडवी माय जिजाबाई
नकोस विसरू ऋण आईचे, स्वरूप माऊली पुण्याईचे
थोर पुरुष तो ठरून तियेचा होई उतराई
- ग. दि. माडगूळकर
मातृदिनाच्या शुभेच्छा!
आई असतो एक धागा
वातीला उजेड दावणारी समईतली जागा,
घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान
- फ. मु. शिंदे
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिन झोका झाडाले टांगला,
पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला
- बहिणाबाई चौधरी
मातृदिनाच्या मनापासून शुभेच्छा!
दिला जन्म तू विश्व हे दाविलेस
किती कष्ट माये सुखे साहिलेस,
जिण्यालागी आकार माझ्या दिलास,
तुझ्या वंदितो माउली पाऊलांस!
- ग. दि. माडगूळकर
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात
मेतकूट कालवलेला मऊ तूपभात,
आई म्हणजे देव्हाऱ्यातले लक्ष्मीचे चित्र
सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र,
- शांताबाई शेळके
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
(हेही वाचा: मदर्स डे यंदा 8 मे दिवशी; जाणून घ्या या दिवसाच्या सेलिब्रेशन मागील कहाणी)
दरम्यान, आईचे आपल्या आयुष्यातील स्थान अगदी अनन्यसाधारण असते. तिचे महत्त्व, महती व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. खरे तर आईला सन्मान देण्यासाठी कुठला एक खास दिवस कशाला पाहिजे? ती तर दररोज सन्माननीय आहे. परंतु मातृदिनादिवशी तिची विशेष काळजी घ्या, या दिवशी तिला सप्रेम भेट म्हणून एखादी प्रिय वस्तू गिफ्ट करा, शुभेच्छा द्या. धर्मसूत्रांनी मातेची सेवा-शुश्रूषा आणि तिचे भरणपोषण हे पुत्राचे आवश्यक कर्तव्य म्हणून सांगितलेले आहे, त्याचे पालन करा.