Mother's Day 2020 Gift Ideas: यंदा लॉकडाऊनमध्येही 'मदर्स डे' स्पेशल करू शकतात ही खास गिफ्ट्स!
Happy Mothers Day| Photo Credits: Pixabay.com

Happy Mother's Day 2020:  मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी जगभरात अनेक ठिकाणी 'मदर्स डे' (Mother's Day) साजरा केला जातो. यंदा जगात कोरोना व्हायरसचं सावट असल्याने यावर्षी 'मदर्स डे सेलिब्रेशन' थोडं वेगळं असेल. लॉकडाऊन असल्याने सहाजिकच लोकांच्या वावरण्यावर बंदी असेल पण याचा अर्थ असा नाही की यंदा तुम्हांला मदर्स डे सेलिब्रेशन रद्द करावं लागेल. यावर्षी लॉकडाऊनमुळे जगभरात अनेक ठिकाणी सारं कुटुंब एकत्र घरामध्ये आहे. त्यामुळे Coronavirus Pandemic मध्ये आलेला यंदाचा मदर्स डे कदाचित आत्तापर्यंतचा सगळ्यात अविस्मरणीय मदर्स डे देखील बनू शकतो. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये तुम्ही सध्या कुठे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आहात यामध्ये थोडा विचार केलात तर यंदाचा मदर्स डे देखील तुम्ही तुमच्या आईला काही खास गिफ्ट्स देऊन स्पेशल करू शकणार आहात.

जर तुम्ही यंदा आईसोबत असाल तर तुमची मज्जाच मज्जा आहे. तिच्यासोबत यंदा तुम्ही जास्त काळ घालवला असेल. पण लॉकडाऊनमुळे तुम्ही यंदा आईला भेटू शकणार नसाल तरीही इंटरनेट आणि व्हर्च्युअल जगात आता काहीच अशक्य नाही. मग पहा लॉकडाऊनमध्ये यंदा तुम्ही आईला कोणती सरप्राईज देऊन खुश करू शकता?

लॉकडाऊनमधल्या यंदाच्या मदर्स डे साठी खास गिफ्ट आयडिया

थोडं Creative व्हा!

यंदा लॉकडाऊन असल्याने अनेकांकडे वेळच वेळ आहे. मग थोडं Creative व्हा. तिच्या आवडीनिवडी पाहून यंदा वेगळं काय करता येऊ शकतं का? हे बघा. यामध्ये आजकाल डिजिटल कॅरिकेचरर्स बनवून मिळू शकतात. तुम्ही आईचं कॅरिकेचर बनवणं शक्य नसेल तर अनेक ऑनलाईन सेवा फोटो पाहून ई पेन्सिल कॅरिकेचर्स बनवून देतात. मग यंदा नेहमीचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज फॉरवर्ड करण्याऐवजी खास मेसेजसह ई पेन्सिल कॅरिकेचर्स फॉर्वर्ड करून पहा. Mother's Day DIY Card Ideas: मदर्स डे दिवशी यंदा आई साठी स्पेशल गिफ्ट म्हणून घरच्य घरी कशी बनवाल ग्रीटिंग कार्ड्स! (Watch Video).

मास्टरशेफ !

लॉकडाऊनच्या वेळेचा वापर करून अनेक जण नवनवीन पदार्थ करायला शिकले आहेत. तुमच्यामधलंही हे 'मास्टरशेफ' टॅलेंट आजमावून बघायचं असेल तर यंदा मदर्स डे ला आईसाठी एखादा पदार्थ बनवून तिला सरप्राईज देऊ शकता. यंदा हॉटेल्स, रेस्टारंट बंद असल्याने प्रत्येक ठिकाणी केक, चॉकलेटस तयार मिळेलच याची खात्री नाही. पण अशा परिस्थितीतही कमीत कमी पदार्थ वापरून देखील केक बनवू शकता. त्यासाठी तुम्हांला युट्युबवर ओव्हन,यिस्ट, बेकरी शिवायही केक बनवू शकता असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

फुलं

सध्या कोणीच बाहेर पडू शकत नसल्याने अनेकांची घरात बसून चीडचीड होत आहे. सतत कोरोना व्हायरस महामारीबद्दल निगेटिव्ह बातम्यांचा, खोट्या बातम्यांचा भडिभार होत असल्याने अनेक ठिकाणी नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. पण हे वातावरण बदलण्याची क्षमता निसर्गामध्ये आहे. ताजी फुलं यंदा 'मदर्स डे' च्या निमित्ताने घरपोच पोहचवण्यासाठी काही ऑनलाईन पोर्टल्स नक्कीच पुढे आली आहेत.

ऑनलाईन शॉपिंग

यंदा सोने खरेदीचा साडेतीन मुहूर्तांपैकी दोन मुहुर्त हुकले आहेत. पण मदर्स डेचं औचित्य साधून तुम्ही आईसाठी ऑनलाईन काही दागिन्यांची खरेदी करू शकता. अनेक ज्वेलर्सनी आता ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून व्यवहार सुरू ठेवले आहेत. त्यामुळे मदर्स डे ला खरेदी करा आणि लॉकडाऊन संपला की वस्तू ताब्यात घ्या अशा सुविधा आहेत. आता ग्रीन झोन, ऑरेंज झोन मध्येही ई कॉमर्स साईटवरून वस्तूंची खरेदी आजपासून सुरू झाली आहे. मग तुम्ही कोणत्या भागात आहात ते पाहून आता फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनवर बुकिंग सुरू करण्यात आलं आहे.

जुन्या आठवणी

आत्तापर्यंत तुम्हांला जुने अल्बम, फोटो काढून त्या प्रत्येक फोटोमागची गोष्ट ऐकायची संधी मिळाली नसेल तर यंदा मदर्स डेला हा खास प्रोग्राम बनवा. घरातले सगळे जुने अल्बम काढून सारे एकत्र बसा आणि फोटो बघा. तुम्ही नकळत आईला जुन्या आठवणींमध्ये घेऊन जाल आणि तिला त्या जुन्या, सुंदर आणि नेहमीच्या दगदगीत मागे राहिलेल्या गोष्टी पुन्हा आठवणींच्या माध्यमातून जगायला संधी द्याल.

लॉकडाऊनमध्ये यापैकी देखील काही अगदीच काही शक्य नसेल तर ऑनलाईन अनेक ठिकाणी आता केक, कुकीजची ऑर्डर घेतली जात आहे. त्यामुळे अगदीच आयत्या वेळेस तुम्हांला ऑर्डर करायची असेल तर हा पर्याय खुला असेल.