![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/07/combine-380x214.jpg)
Mangala Gauri Vrat 2021 Dates: अल्पावधीतच श्रावण महिन्याला प्रारंभ होईल. श्रावण महिना म्हटलं की, सणवार, व्रतवैकल्यं यांची अगदी बरसात असते. श्रावण महिन्यात प्रत्येक वाराला अगदी विशेष महत्त्व आहे. त्यातील श्रावणी मंगळवार म्हणजे मंगळागौर पूजनाचा दिवस. नवविवाहितांसाठी खास असणारे हे व्रत उत्साहाची आणि आनंदाची पर्वणी घेऊन येतं. यंदा 9 ऑगस्टपासून श्रावण महिन्यास सुरुवात होत आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 10 ऑगस्टला मंगळवार आहे. त्यामुळे हा मंगळवार धरुन एकूण 4 मंगळवार मंगळागौर पूजनासाठी मिळत आहेत.
पूर्वीच्या काळी स्त्रियांचे जीवन चुलमूल इतक्यातच मर्यादीत होते. त्यामुळे अशा सणासभांना त्यांना नटण्या थटण्याची हौस पुरवता येत होती. मनसोक्त गप्पा गोष्टी करता यायच्या. खेळ रंगायचे. एकंदर काय आपल्या या व्रतांमुळे स्त्रियांना रोजच्या जीवनापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळायची. मंगळागौरीचे व्रत हे लग्न झाल्यानंतर पहिली पाच वर्षे केले जाते. नवविवाहितेला अखंड सौभाग्य व तिच्या सासर-माहेरास सुखसमृद्धी लाभावी म्हणून हे व्रत करतात. आईने मुलीला लग्नानंतर दिलेले सौभाग्य व्रत म्हणून मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे.
मंगळागौर पूजनाचे दिवस:
पहिला मंगळवार | 10 ऑगस्ट |
दुसरा मंगळवार | 17 ऑगस्ट |
तिसरा मंगळवार | 24 ऑगस्ट |
चौथा मंगळवार | 31 ऑगस्ट |
मंगळगौर पूजन कसे कराल?
मंगळागौरीची पूजा करताना अन्नपूर्णा देवीच्या मूर्ती शेजारी महादेवाची पिंड ठेवतात. भटजींना बोलावून मंगळागौरीची साग्रसंगीत पूजा केली जाते. मंगळागौरीची कहाणी वाचन झाल्यानंतर भोजनाचा कार्यक्रम पार पडतो. भोजन शक्यतो मुक्याने केले जाते. मग हळदीकुंकवाचा कार्यक्रम असतो. हळद-कुंकू, विडयाची पाने, सुपारी आणि साखर सवाष्णींना दिली जाते. रात्रभर मंगळागौर जागवतात. त्यावेळी उखाण्यांचा कार्यक्रम रंगतो. तसंच फुगडया, झिम्मा, भेंडया असे विविध खेळ खेळले जातात. दुसऱ्या दिवशी दहीभाताचा नैवेद्य दाखवून मंगळागोरीची आरती म्हटली जाते. त्यानंतर अक्षता टाकून देवीचे विसर्जन करतात. लग्नानंतर पाच वर्ष मंगळागौरी साजरी केली जाते. त्यानंतर पाचव्या वर्षी या व्रताचे उद्यापन करतात.
मंगळागौरी दिवशी पार्वती देवीची पूजा करुन जागरण केले जाते. जागरणात पारंपारिक खेळ खेळले जातात. यंदाही कोरोना व्हायरसचे संकट कायम आहे. त्यामुळे नियमांचे पालन करुनच सणाचा आनंद घ्या.