
Holi 2021: होळी हा एक उत्सव आहे, ज्याची प्रत्येकजण उत्सुकतेने वाट पाहत असतो. फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन (Holika Dahan) सादर केले जाते आणि दुसर्या दिवशी रंगाची होळी (Holi Celebration) साजरी केली जाते. होळीच्या दिवशी लोक मोठ्या थाटामाटात रंगीबेरंगी होळीचा सण साजरा करतात. या दिवशी लोक विविध रंगांचा वापर करून होळी खेळतात. होळी सण लोक नाचून, गाऊन आनंदात साजरा करतात. होळीचा सण देशाच्या कानाकोपऱ्यात अतिशय उत्सहात साजरा केला जातो. मात्र, भारतातील असे काही ठिकाणं आहेत, जेथे लोक होळीच्या नावानेही घाबरतात आणि होळी खेळण टाळतात. आज या खास लेखातून भारतात कोणत्या ठिकाणी लोक होळी खेळणं टाळतात आणि त्यामागचे रहस्य काय आहे, हे जाणून घेऊयात. (वाचा - Holika Dahan 2021: आज होलिका दहनाचा दिवस; जाणून घ्या होळी पेटवण्याचा मुहूर्त काय?)
झारखंडच्या बोकारो जिल्ह्यातील दुर्गापूर गाव -
झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातील दुर्गापूर गावात होळीच्या नावाने लोक घाबरतात आणि होळीच्या दिवशी चुकून एकमेकांना रंग लावत नाहीत. इथल्या प्रचलित मान्यतेनुसार, हे गाव राजा दुर्गदेवने निर्माण केले होते. त्याच्या कारकिर्दीत होळीचा सण मोठ्या उत्सहाने साजरा केला जात असे. मात्र, होळीच्या दिवशी राजाच्या मुलाचा मृत्यू झाला. असं म्हटलं जात की, जेव्हा गावातील लोकांनी राजाच्या मुलाच्या मृत्यूनंतर होळी साजरी केली, त्यावर्षी गावकऱ्यांना तीव्र दुष्काळ आणि साथीचा सामना करावा लागत असे. यात गावातील बऱ्याच लोकांचा मृत्यू होत असे. तसेच होळीच्या दिवशी, राजा दुर्गादेव रामगढ येथे राजा दलीलसिंह यांच्याबरोबर झालेल्या युद्धाच्या वेळी मरण पावला. या बातमीने राणीनेही आत्महत्या केली. असं म्हणतात की, मृत्यू होण्यापूर्वी राजाने आपल्या प्रजेला कधीही होळी न साजरा करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शतकानुशतके या ठिकाणी होळी खेळली जात नाही.
उत्तर प्रदेशमधील रायबरेलीतील खजुरी गाव -
उत्तर प्रदेशच्या रायबरेलीच्या खजुरी गावात होळीच्या दिवशी लोक रंग खेळण्याऐवजी शोक करतात. असं मानलं जातं की, खजुरी गावचा किल्ला होळीच्या दिवशी मोगल राज्यकर्त्यांनी नष्ट केला आणि त्यामुळे शेकडो लोक मरण पावले. त्यानंतर आजपर्यंत येथे होळीचा सण साजरा केला जात नाही.
उत्तराखंडमधील क्वीला, कुरझण आणि जौंदली गाव
उत्तराखंडमधील क्वीला, कुरझण आणि जौंदली या गावात गेल्या दीडशे वर्षांपासून होळी खेळली जात नाही. या खेड्यांमध्ये होळी न साजरा करण्याविषयी अनेक मान्यता आहेत. असे म्हटले जाते की, या खेड्यांचे प्रतिष्ठित देवता त्रिपुरा सुंदरी देवी आहे, ज्यांना गोंधळ आवडत नाही. तसेच असंही म्हणतात की, दीडशे वर्षांपूर्वी या खेड्यांमध्ये लोकांनी होळी साजरी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा इथले लोक कोलेराचे बळी ठरले. तेव्हापासून इथले लोक होळी खेळणे टाळतात.
राजस्थानमधील चोवाटिया जोशी जातीचे लोक -
राजस्थानमध्ये, ब्राम्हण समाजातील चोवाटिया जोशी जातीतील लोक होळी साजरी करणे टाळतात. असे म्हटले जाते की, खूप काळापूर्वी, या जातीच्या महिलेचा मुलगा होलिकामध्ये पडला होता, जेव्हा ती होलिकाची पवित्र अग्नीला प्रदिक्षणा घालत होती. आपल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात या महिलेचाही मृत्यू झाला होता. त्यावेळी मरताना या महिलेने या जातीचे लोक यापुढे होळी साजरी करणार नाही, असं म्हटलं होतं. तेव्हापासून या जातीचे लोक होळीचा सण साजरा करत नाहीत.