Happy Mother’s Day 2019: कसा सुरु झाला मदर्स डे? जाणून घ्या मातृत्व दिन इतिहास आणि बरंच काही
Happy Mother’s Day 2019

Happy Mother's Day 2019: आई (Mother) म्हणजे सहवास, आई म्हणजे नाव, गाव आणि आयुष्याची शिदोरी वैगेरे वैगेरे.... हे सगळं आठवतं जेव्हा आईबद्दल काहीतरी लिहायचं असतं तेव्हा. इतर वेळी आई हा विषय आपण आपल्या सर्वसामान्य जगण्यात इतका गृहित धरलेला असतो की, त्याची वेगळी अशी दखलही आपल्याला घ्यावी वाटत नाही. अर्थात हे निरिक्षण सर्वांनाच लागू पडते असे नाही. पण, आईबद्दल भरभरुन बोलले जाते ते म्हणजे ज्या दिवशी असतो मातृदिन. जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होतो. यंदाही हा दिवस महाराष्ट्र, देश आणि जगभरात साजरा केला जाईल. असा हा मातृदिन अर्थातच Mother’s Day साजरा करण्यास नेमकी सुरुवात कशी झाली? जाणून घ्या मदर्स डे (Mother’s Day)इतिहास आणि बरंच काही.

मातृदिन (Mother’s Day) म्हणजे काय?

जगभरातील सर्व महिलांसाठी ज्या आई झाल्या आहेत. ज्यांनी मानव या प्रजातीतील प्रत्येकाला सृष्टीत जन्म दिला आहे असा स्त्रीला. तिच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी, तिचा सन्मान करण्यासाठी, इतरांसाठी सतत कष्ट उपसत असताना प्रत्येक टप्प्यावर जिची भूमिका बदलत जाते अशा प्रत्येक स्त्रिसाठी विशेषत्वाने साजरा केला जाणारा दिवस म्हणजे मातृदिन.

अशी झाली Mother’s Day ची सुरुवात

मातृत्वदिनाची पहिली सुरुवात झाली ती अमेरिका देशात. अमेरिकन अॅक्टिविस्ट अॅना जार्विस ही आपल्या आईवर प्रचंड प्रेम करत होती. ती अविवाहीत होती. तसेच, तिने एखादे अपत्यही दत्तक म्हणून घेतले नव्हते. ती सदैव आपल्या आईसोबतच राहात असे. जिवलग आईचा मृत्यू झाल्यावर अॅना जार्विस हिने आईच्या स्मृतिप्रित्यार्थ मदर्स डे (Mother’s Day) साजरा करण्यास सुरुवात केली. (हेही वाचा, Mother’s Day 2019 Gift Ideas: मदर्स डे निमित्त आईला सरप्राईज देण्यासाठी '5' बजेट फ्रेंडली आणि हटके गिफ्ट आयडियाज!)

मदर्स डेची तारीख कधीच ठरलेली नसते

जगभरात साजरे केले जाणारे विविध दिवस हे विशिष्ठ तारखेला असतात. पण, मदर्स डेचे वैशिष्ट्य असे की, हा दिवस साजरा करण्यासाठी कोणतीच तारीख कधीही पक्की ठरलेली नसते. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी 9 मे 1914 रोजी एक कायदा संमत केला. या कायद्यात लिहिले होते की, प्रत्येक वर्षाच्या दुसऱ्या रविवारी Mother’s Day साजरा करण्यात यावा. अमेरिकेत हा कायदा पास झाला तरी त्यानंतर भारत आणि इतर देशांमध्येही हा दिवस साजरा केला जाऊ लागला. आणि तो सुद्धा प्रत्येक वर्षीच्या मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी. यंदा Mother’s Day 12 मे रोजी आहे. (हेही वाचा, Mother’s Day 2019 Quotes and Messages: तुमच्या आयुष्यातील आईचे महत्त्व सांगणारे हे विचार शेअर करुन आईला द्या मातृदिनाच्या शुभेच्छा!)

मदर्स डे साजरा करण्याच्या पद्धती

मदर्स डे साजरा करण्याच्या पद्धती व्यक्ती, संस्था आणि समाजपरत्वे विभिन्न आढळतात. काही संस्था या दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करतात. ज्यात चर्चा, परिसंवाद, आरोग्य शिबिरं आदिंचा समावेश असतो. तर, काही लोक आर्थिक रुपात, किंवा वस्तू रुपात आईला भेट देतात. काही लोक आपले प्रेम व्यक्त करतात. प्रेम व्यक्त करण्याची भावना ही ज्याच्या त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असते.