Hajj Yatra (Photo Credits-Facebook)

केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी शुक्रवारी सांगितले की, हज यात्रेला (Haj 2022) जाण्यासाठी इच्छुकांना कोविड-19 लसीचे (Covid-19 Vaccine) दोन्ही डोस घ्यावे लागतील. हज-2022 ची संपूर्ण प्रक्रिया भारत आणि सौदी अरेबिया सरकारने ठरवलेल्या कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांनुसार असेल. हज आढावा बैठकीनंतर त्यांनी असेही सांगितले की, हज-2022 ची अधिकृत घोषणा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली जाईल आणि अर्जाची प्रक्रिया देखील त्याच वेळी सुरू होईल. हज-2022 साठी जाणाऱ्या लोकांसाठी भारत आणि सौदी अरेबियामध्ये कोरोना प्रोटोकॉल आणि आरोग्य आणि स्वच्छतेबाबत विशेष प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, ‘यावेळी सौदी अरेबिया आणि भारत सरकारचे आरोग्य मंत्रालय आणि कोरोना प्रोटोकॉल लक्षात घेऊन हज 2022 ची तयारी सुरू करण्यात आली आहे. हज 2022 ची अधिकृत घोषणा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केली जाईल. हज 2022 ची भारताची संपूर्ण प्रक्रिया 100% ऑनलाइन/डिजिटल असेल.’ हज 2022 मध्ये कोरोना विषाणू साथीची परिस्थिती पाहता राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल-मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जाईल.

हज-2022 ची संपूर्ण प्रक्रिया, सौदी अरेबिया सरकार आणि भारत सरकारद्वारे कोरोना आपत्ती लक्षात घेता निश्चित केलेली पात्रता, वयाचे निकष, आरोग्याची स्थिती आणि सर्व आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांनुसार होईल. मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, कोरोना महामारी आणि त्याचा प्रभाव लक्षात घेऊन हज व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल आणि सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये भारत आणि सौदी अरेबिया मध्ये निवास, सौदी अरेबिया मध्ये हज यात्रेकरूंचा मुक्काम कालावधी, वाहतूक, आरोग्य आणि इतर अनेक व्यवस्था यांचा समावेश आहे.

हज 2020-2021 साठी 3000 पेक्षा जास्त महिलांनी 'मेहरम' (पुरुष नातेवाईक) शिवाय अर्ज केल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या महिलांनी 'मेहरम' शिवाय हज यात्रेअंतर्गत हज 2020 आणि 2021 साठी अर्ज केले ते हज 2022 साठी देखील वैध असतील.