Guru Nanak Jayanti 2019: 12 नोव्हेंबर ला साजरी होणार गुरु नानक देव यांची 550वी जयंती, शीख धर्माच्या पहिल्या संस्थापकांविषयी 'या' 10 गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
गुरु नानक जयंती 2019 (Photo Credits: File Image)

शीख धर्मीयांसाठी महत्वाचा असा गुरु नानक जयंती (Guru Nanak Jayanti 2019) चा सोहळा यंदा 12 नोव्हेंबर रोजी देशभरात मोठा उत्साहात साजरा होणार आहे. गुरु नानक देव यांची यंदा 550वी जयंती आहे. शीख धर्माचे पहिले संस्थापक अशी ओळख प्राप्त असणारे गुरु नानक देव (Guru Nanak Dev) हे आपल्या आध्यात्मिक, राजनैतिक आणि सामाजिक शिकवणींसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या जीवनकाळात त्यांनी प्रेम आणि समानतेला प्राधान्य देत शीख धर्माची बांधणी केली, म्ह्णूनच हा सोहळा शीख पंथीयांसाठी आजही खास आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीवर गुरु नानक जयंती साजरी होते, यालाच प्रकाश पर्व (Prakash Parv) किंवा गुरु पूरब (Guru Purab)  म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी गुरु नानक यांच्या शिकवणीचे स्मरण करून त्यांचे अनुयायी गुरुद्वाऱ्याला भेट देतात.

यंदाच्या 550 व्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु नानक देव यांच्याविषयी दहा खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत, चला तर मग पाहुयात..

गुरु नानक देव यांच्याशी निगडित 10 खास गोष्टी

1- गुरु नानक यांचा जन्म 15 एप्रिल 1469 रोजी पंजाब प्रांतातील तलवंडीन (आताच्या पाकिस्तनचा एक भाग) येथे झाला होता. हे स्थान आता ननकाना साहिब या नावाने देखील ओळखले जाते. गुरू नानक यांचा जन्म जरी एप्रिल महिन्यातील असला तरी त्यांची जयंती ही दरवर्षी कार्तिक मासातील पौर्णिमेला साजरी होते.

2- गुरु नानक बालपणापासूनच धार्मिक होते मात्र मौंजी बंधनावेळीच त्यांनी जानवे घालायला नकार दिला होता. ज्ञानप्राप्तीनंतर शीख धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी देशभर यात्रा केली. तसेच हिंदू - मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यासाठी इराकमधील बगदाद आणि सौदी अरेबियात मक्का- मदिनेची ही यात्रा केली होती

3- 24 सप्टेंबर 1487 साली वयाच्या 18 व्या वर्षी गुरु नानक यांचे लग्न झाले होते. त्यांना श्री चंद आणि लक्ष्मी चंद नामक दोन मुले होती.

4-गुरु नानक हे मानवतावादी होते. असमानता, लिंगभेद, धार्मिक हिंसा, गुलामी, जातीय भेदभाव याने वेढलेल्या समाजात त्यांनी माणुसकीचा प्रचार करण्याचा विडा उचलला होता. हाच संदेश देताना त्यांनी एकदा बेई नदीत स्नान करत 'कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, सर्व जण मानव आहोत', असा नारा दिला होता.

Happy Gurpurab: जीवनातील साऱ्या दुःखांवर उपाय आहेत गुरुनानकांचे हे '9' बहुमूल्य उपदेश !

5- गुरु नानक देव यांनी विविध प्रबोधन केंद्रातून "धर्म हे दर्शन आहे, दिखावा नाही",हा संदेश पसरवण्याचे काम केले होते.

6- शीख धर्मियांचा पवित्र ग्रंथ म्हणजेच गुरु ग्रंथसाहिब मधील सुरुवातीची प्रार्थना 'जपजी साहिब' ही गुरु नानक यांनी लिहिली आहे. संपूर्ण विश्व हे ओंकारातून निर्माण झाले असून, हा ओम तुम्ही गुरु कृपेमुळेच जाणवू शकता. जे आहे ते सर्वत्र आहे पण ते जाणण्यासाठी गुरूंची गरज आहे. असा संदेश या श्लोकातून देण्यात आला आहे.

7- गुरु नानक देव यांच्या शिकवणीत धर्मपालनासाठी तीन महत्वाच्या गोष्टी करण्याचा संदेश मिळतो. यामध्ये इतरांची मदत करा (Vand Chakko), आपले कर्म करताना कोणाचीही फसवणूक करू नका ((Kirat Karo) आणि नामस्मरण करा (Naam Japna) याचा समावेश आहे.

8- गुरु नानक देव यांनी 500 वर्षांपूर्वी लंगर या उपक्रमाची सुरुवात केली होती. यानुसार आजही अनेक गुरुद्वारांमध्ये भेट देणाऱ्या प्रत्येकाला तसेच सर्व धर्माच्या, जातीच्या, लिंगाच्या गरजूना मोफत जेवण पुरवण्याची सोय केली जाते.

9- गुरु नानक देव यांनी आपल्या आयुष्यातील 20 वर्ष ही यात्रेत घालवली ज्यामध्ये त्यांनी चार वेळा पदयात्रा केल्या आलेत. उपमहाद्वीप, पश्चिम आशिया, तिबेट, रोम या ठिकाणी सुद्धा त्यांनी धर्मप्रसारासाठी भेट दिली होती.

10- 22 सप्टेंबर 1539 रोजी गुरु नानक यांचा मृत्यू झाला, यानंतर त्यांचा भाऊ लीना याला त्यांचा उत्तराधिकारी म्ह्णून नेमण्यात आले ज्यांना पुढे गुरु अंगद म्ह्णून ओळख प्राप्त झाली.

गुरु नानक देव यांच्या कामावर नजर टाकताच आपल्याला दिसून येते की ते एक महान योगी,धर्म सुधारक, समाज सुधारक, कवी, देशभक्त, होते. प्रत्येक वर्षी त्यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी शीख धर्माचे अनुयायी नगरकीर्तन म्हणजेच धार्मिक जुलूस काढत आनंद साजरा करतात.