Chandi Padvo 2020 निमित्त गुजरातच्या सुरत मध्ये विशेष  ‘Gold Ghari’ बाजारात; किंमत प्रतिकिलो 9000 रूपये
गोल्ड घारी (Photo Credits: ANI)

कोरोना संकटकाळामध्ये सध्या देशभरात सणासुदीचा काळ देखील सुरू झाला आहे. सण म्हटले की मिठाई आलीच. नवरात्रीपासून विविध सणांचा मौसम सुरू झाल्याने बाजारातही त्याअनुषंगाने मिठाया उपलब्ध करून दिल्या जात आहेत. नातेवाईकांना, प्रियजनांना सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी मिठाई हमखास दिली-घेतली जाते. पण गुजरातमध्ये एका मिठाईची किंमत ऐकूण तुम्ही थक्क व्हाल. गुजरातच्या सुरत मध्ये एका स्वीट शॉप मध्ये 'गोल्ड घारी'(Gold Ghari) नावाची एक मिठाई उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याची किंमत सुमारे प्रतिकिलो 9 हजार रूपये इतकी आहे. दरम्यान शरद पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी चंडी पाडवा हा सण साजरा केला जातो. त्या निमित्ताने घराघरामध्ये घारी बनवण्याची, खाण्याची पद्धत आहे. Manohari Gold Tea: आसामच्या दुर्मिळ चहाला यंदा लिलावात प्रतिकिलो 75,000 रूपयांचा विक्रमी दर.

गुजरात मधील ही पारंपारिक मिठाई यंदा नव्या स्वरूपामध्ये सादर करण्यात आली आहे. सामान्य स्वरूपात मिळणारी घारी ही 660-820 रूपये प्रतिकिलो या दरामध्ये उपलब्ध केली जाते. पण सुरतच्या एका मिठाई व्यापाराने स्पेशल घारी मध्ये सोन्याचा वर्ख लावत त्याला नव्या रूपात लोकांसमोर ठेवलं आहे. सोन्याच्या वर्खामुळे आता या घारीची किंमत 9 हजार प्रतिकिलो झाली आहे.

ANI Tweet

चंडी पाडवा निमित्त बनवली जाणारी घारी मिठाई ही मावा, साखर, देशी तूप आणि ड्राय फ्रुट्स यांना मिसळून बनवली जाते. मात्र सुरतच्या व्यापार्‍याने त्यावर सोन्याचा वर्ख लावला आहे. तर मिठाईचं नाव गोल्ड घारी ठेवलं आहे. दरम्यान सोन्याचे आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत. आयुर्वेदानेही सोन्याला लाभदायी धातू असल्याचं म्हटलं आहे. सध्या गोल्ड घारीला कमी प्रतिसाद आहे पण भविष्यात तो हळूहळू वाढेल असा मिठाई व्यापार्‍या विश्वास देखिल आहे.