International Women's Day 2020: आज संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women’s Day) साजरा केला जाईल. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून गुगलने (Google) आज आपल्या खास शैलीत डुडल (Doodle) च्या माध्यमातून, सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने यासाठी, आज जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, याचे उदाहरण दिले आहे. विविध क्षेत्रातील आणि वेगवेगळ्या पिढ्यांच्या महिला या गुगल डुडलमध्ये दिसत आहेत.
यातील बहुस्तरीय थ्रीडी पेपर हा महिला दिनाच्या शक्तिशाली उत्सवाचा इतिहास आणि त्याचे स्त्रियांसाठी असणारे महत्व दर्शवतो. यातील काळा-पांढरा मध्यवर्ती स्तर हा कामगार चळवळी दरम्यानच्या, म्हणजेच 1800 दशकाचा शेवट ते 1930 च्या दरम्यानच्या महिलांना प्रतिबिंबित करतो. बाह्य लेयर ही 1990 ते आजपर्यंतच्या महिलांचे प्रतीक आहे. ही लेयर गेल्या 100 वर्षांत महिलांच्या चळवळींमधून झालेली प्रगती दर्शवते. अशाप्रकारे गुगलने सर्व क्षेत्रातील, देशांतील, सर्व जाती-धर्माच्या, सर्व वयाच्या स्त्रियांना शुभेच्छा देऊन, त्यांच्याप्रती असलेला सन्मान, आदर आणि प्रेम व्यक्त केले आहे.
पहा व्हिडीओ -
दरम्यान, 1908 सालच्या 8 मार्च रोजी न्यूयॉर्कमध्ये हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात आपल्या हकांसाठी लढा दिला होता. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता यासोबत लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा, या त्यांच्या मागण्या होत्या. या आंदोलनाच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. काही देशात हा दिवस मातृदिन म्हणूनही साजरा केला जातो.