दिवाळीचा (Diwali) सण आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशामध्ये धनतेरस, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा या शुभ मुहुर्तांवर सोनं खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. पण यावर्षी दिवाळी पूर्वीच आज (28 ऑक्टोबर) गुरू पुष्यामृत योग (Gurupushyamrut Yog) आल्याने तुम्हांला सोनं खरेदीसाठी अजून एक शुभ मुहूर्त मिळाला आहे. त्यामुळे ऑनलाईन किंवा सराफा दुकानात जाऊन तुम्ही आज सोनं खरेदी करू शकता. मग आजपासून सुरू झालेल्या या सोनं खरेदीच्या शुभ मुहूर्तांच्या मालिकांमधील पहिल्या दिवशीचा पहा सोनं, चांदीचा नेमका दर किती?
goodreturns.in च्या माहितीनुसार, मुंबई मध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्राम 4,812 आहे. तर 22 कॅरेटचा दर 4,712 आहे. दागिने हे प्रामुख्याने 22 किंवा अपवादात्मकतेने 23 कॅरेट मध्ये बनवले जातात. पण केवळ गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करत असाल तर 24 कॅरेटचं वळं, बिस्कीट आणि नाणं देखील घेतलं जाऊ शकतं. आज सराफा बाजारात चांदी 65,000 रूपये किलो आहे.
गुरूपुष्यामृत मुहूर्त
गुरू-पुष्य नक्षत्र ज्या गुरूवारी एकत्र येतो तो दिवस गुरूपुष्यामृत योग असतो. आज या शुभ मुहूर्ताची सुरूवात सकाळी 9 वाजून 40 मिनिटांनी होणार असून 29 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजून 40 मिनिटांपर्यंत तो कायम राहणार आहे.
गुरूपुष्यामृत मुहूर्तावर सोनं चांदी खरेदी प्रमाणेच नव्या वस्तूंची, मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं, गृहप्रवेश, गुंतवणूक देखील केली जाते. सोबतच या दिवशी दान धर्म करण्याची देखील प्रथा आहे.
टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहलेला आहे. लेटेस्टली मराठी यामधील कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही.