Gatari 2021 Dates: श्रावण महिना हा सणवार, व्रतवैकल्यांचा असल्याने या महिन्यात मांसाहारी पदार्थ टाळले जातात. त्यामुळे श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी नॉनव्हेजवर मस्त ताव मारला जातो. यानिमित्ताने गटारी सेलिब्रेट केली जाते. यंदा गटारी अमावस्या रविवार, 8 ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे. आषाढी अमवस्या ही गटारी अमावस्या म्हणून साजरी केली जाते. त्यामुळे गटारी निमित्त एकत्र जमून नॉनव्हेजचे चमचमीत पदार्थांवर ताव मारण्यासाठी रविवार अगदी जुळून आला आहे. विकेंड असल्याने छानशी ट्रिपही तुम्ही प्लॅन करु शकता.
आषाढी अमावस्या दीप अमावस्या म्हणूनही साजरी केली जाते. या दिवशी घरातील दिवे घासून पुसून लख्ख केले जातात. ते लावून त्यांची पूजा केली जाते. यापुढे श्रावणातील व्रत वैकल्यांना सुरुवात होते. काही मंडळी दिप अमावस्या साजरी करत असल्याने त्या दिवशी मांसाहार वर्ज्य करतात. त्यामुळे त्याआधीच्या वारी नॉन व्हेज खाऊन गटारी साजरी केली जाते.
आषाढी अमावस्या मुहुर्त:
आषाढी अमावस्या शनिवार, 7 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.11 मिनिटांनी सुरु होत असून रविवार, 8 ऑगस्ट रोजी 7.19 मिनिटांनी संपणार आहे.
साधारणपणे आपल्याकडे आठवड्यातील 3 दिवस मासांहार केला जातो. बहुतांश रुपाने ते वार बुधवार, शुक्रवार आणि रविवार असतात. परंतु, खाण्याची आवड असणारी मंडळी कधीही मासांहाराचा आस्वाद घेऊ शकतात. त्यामुळे रविवारच्या आधी बुधवार, 4 ऑगस्ट आणि शुक्रवार 6 ऑगस्ट रोजी तुम्ही गटारी सेलिब्रेट करु शकाल. दरम्यान, काहीजण श्रावण संपताच लगेचच मांसाहार घेतात तर काहीजण गणपती विर्सजनानंतर नॉन व्हेज खाणे सुरु करतात. असे असल्यास तब्बल दीड महिन्यानंतर नॉन व्हेज खाण्याचा योग येणार आहे. त्यामुळे कोविड-19 नियमांचे पालन करत गटारीचा पुरेपूर आनंद घ्या.