गणेशोत्सव २०१८: फळीवरच्या वंदनाला खाली उतरवा आणि बाजारातून आरतीचे पुस्तक घेऊन या

मुंबई: गणपतीची आरती म्हणताना तुम्ही ‘लंबोदर पितांबर , ‘फळीवर वंदना’, ‘ओटी शेंदुराची’, ‘संकष्टी पावावे’ म्हणता? असे म्हणत असाल तर तुम्हाला साष्टांग दंडवत आणि एक नम्र विनंती. पहिल्यांदा बाजारात जा आणि गणपतीची आरती असलेले पुस्तक खरेदी करा. ते काळजीपूर्वक वाचा. केवळ वाचूच नका तर, ते शब्दही जसे आहे तसेच वाचा. हे सर्व करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती वाचा.

तुम्ही जर खरोखरच गणेशभक्त असाल आणि त्याची मनोभावे सेवा करत असाल तर, तुमच्यासाठी आणि गणपतीची आरती म्हणणाऱ्या प्रत्येकासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्यापैकी अनेकजण गणपतीची आरती म्हणताना हमखास चुका करतात. ज्यामुळे त्या शब्दांचाच नव्हे तर, संपूर्ण वाक्याचाच अर्थ बदलून जातो. आरतीदरम्यान केल्या जाणाऱ्या याच चुका दाखवणारा एक मेसेज सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाला आहे. जो वाचून आपण सर्वांनीच गणपतीची आरती म्हणताना काळजी घ्यायला हवी. या मेसेजच्या माध्यमातून आरतीवेळी होणाऱ्या चुका तर सांगितल्या आहेतच. पण, वापरल्या जाणाऱ्या चुकीच्या शब्दांऐवजी कोणता योग्य शब्द वापरला पाहिजे हे देखील आवर्जून सांगितले आहे.

पाहा गणपतीची आरती म्हणताना लोक काय चुका करतात….

चूक – लंबोदर पितांबर ‘फळीवर वंदना’

बरोबर – लंबोदर पितांबर फणिवर वंदना

चूक – ‘ओटी शेंदुराची’

बरोबर – उटी शेंदुराची

चूक – ‘संकष्टी पावावे’

बरोबर – संकटी पावावे

चूक – वक्रतुंड ‘त्रिमेना’

बरोबर – वक्रतुंड त्रिनयना

चूक – दास रामाचा वाट पाहे ‘सजणा’

बरोबर – दास रामाचा वाट पाहे सदना

चूक – ‘लवलवती’ विक्राळा

बरोबर – लवथवती विक्राळा

चूक – ओवाळू आरत्या ‘सुरवंट्या’ येति

बरोबर – ओवाळू आरत्या कुरवंड्या येति

 

॥ श्रीगणपतीची आरती॥

 

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता वीघ्नाची।

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची॥

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।

कंठी झळके माळ मुक्ता फळांची॥1॥

जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती।

दर्शनमात्रें मन: कामना पुरती॥ ध्रु.॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा।

चंदनाची उटी कुंकुमकेशरा॥

हिरेजडित मुगुट शोभतो बरा।

रूणझुणती नुपुरे चरणी घागरीया॥ जय.॥2॥

लंबोदर पीतांबर फणिवरवंधना।

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना॥

दास रामाचा वाट पाहे सदना॥

संकटी पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवरवंदना ॥ जय.॥3॥