Ganapati Visarjan | (Photo Credits: PixaBay)

Ganpati Immersion 2019: राजधानी मुंबई (Ganpati Immersion Mumbai) शहरासह, पुणे (Ganpati Immersion Pune), नाशिक, सांगली, लातूर, नागपूर यांसह राज्यभरात आज गणपती विसर्जनाचा उत्साह दिसून येत आहे. गेले काही दिवस गणपती बाप्पांची मनोभावे सेवा केल्यानंतर आज गणपती विसर्जन केले जात आहे. आज अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) असल्याने सर्व अपवाद वगळता सर्व ठिकाणच्या गणपतींचे विसर्जन केले जाते. यात सार्वजनिक गणेश मंडळ ते घरातील गणपतींचाही समावेश असतो. दरम्यान, गणपती विसर्जन मिरवणूकीस होणारी संभाव्य गर्दी ध्यानात घेऊन कायदा व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. मुंबई, पुणे आणि राज्यभरातील इतरही शहरांमध्ये पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुंबईत तब्बल 129 ठिकाणी गणेश विसर्जन होणार आहे. यात सार्वजनिक गणपतींची संख्या सुमारे 5 हजार 630 तर, घरगुती गणपतींची संख्या सुमारे 31 हजार 72 आहे. गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिसांनी गणेश मंडळे आणि गणेश भक्तांना मिरवणुकीचे मार्गही ठरवून दिले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. दरम्यान, गणेश विसर्जन स्थळी समुद्रकिनारी पोलिसांनी जलतरणपटू, नौदलाचे जवान तसेच, मदत पोहोचविण्यासाठी बोटी सज्ज ठेवल्या आहेत. प्रत्यक्ष विसर्जन स्थळी चौपाटीवर 636 जीवरक्षकांसह 65 मोटार बोटी तैनात करुन ठेवण्यात आल्या आहेत. यासोबतच निर्माल्य कलश, विविध वाहनं, नियंत्रण कक्ष, आरोग्य विभागाकडून प्रथोमोपचार कक्ष आदी बाबींची उभारणीही करण्यात आली आहे. (हेही वाचा, Anant Chaturdashi 2019: गणेश विसर्जनासाठी बदलण्यात आले मुंबईतील वाहतूकीचे मार्ग, ट्विटच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सादर केला नकाशा)

दरम्यान, पुणे शहरातही गणपती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली असून, मुठा नदीकाठावर खास विसर्जन हौद उभारण्यात आले आहेत. यंदा धरण परिसरात जोरदार पाऊस पडल्याने मुठा नदी पात्रातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. त्यामुळे गणपती विसर्जन करताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. राज्यभरात अद्यापही पावसाची शक्यता कायम असल्याने मुठा नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे गणपती विसर्जनावेळी विशेष काळजी घेण्यात यावी, असे जलसंपदा विभागाने म्हटले आहे.