Father’s Day 2021 Virtual Celebration Ideas: व्हर्च्युअल मूव्ही नाईटपासून ते एकत्र कुकिंग करण्यापर्यंत, अशा खास पद्धतीने साजरा करू शकता यंदाचा 'फादर्स डे'
Father's Day 2021 Virtual Celebration Ideas (File Image)

जगातील अनेक देशांमध्ये सध्या फादर्स डे (Father's Day 2021) चे सेलिब्रेशन सुरु झाले आहे. यंदा 20 जून रोजी फादर्स डे साजरा होणार आहे. आपले वडील हे आपल्या सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक असतात. मुल जन्माला आल्यापासून वडील त्याच्यासाठी बरेच कष्ट घेतात, अनेक त्याग करतात. आई कदाचित अशा गोष्टी बोलून दाखवेल मात्र वडील कधीच आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करत नाहीत. तर अशा या वडिलांप्रती प्रेम व आदर व्यक्त करण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये विशेषत: अमेरिका, युनायटेड किंगडम, भारत येथे जूनच्या दुसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो.

जगातील काही देशांमध्ये हा दिवस एप्रिल व मे महिन्यात साजरा होतो. तर हा दिवस हास्याने, आनंदाने भरलेला असला पाहिजे, मात्र सध्याच्या कोरोना साथीच्या काळात मोठ्या प्रमाणात हा दिवस साजरा करणे थोडे कठीण आहे. दरवर्षीप्रमाणे कदाचित यंदा तुम्ही घराबाहेर हे दिवस साजरा करू शकणार नाही, परंतु वडिलांना स्पेशल फील करवून देण्यासाठी तुम्ही घरातच हा दिवस खास पद्धतीने साजरा करू शकता.

मात्र जर का या दिवशी तुम्ही तुमच्या वडिलांपासून दूर असाल तर, काही व्हर्च्युअल इव्हेंट्सद्वारे तुम्ही हा दिवस एकत्र साजरा करू शकता. तर यंदाचा फादर्स डे 2021 व्हर्च्युअली साजरा करण्यासाठी आम्ही काही पर्याय देत आहोत.

ईमेलद्वारे मनातील भावना व्यक्त करा –

कदाचित तुम्ही आपल्या वडिलांना पत्र किंवा कार्ड पाठविण्यास असमर्थ असाल, तर ईमेलद्वारे तुम्ही त्यांना ई-कार्ड पाठवून आपल्या मनातील त्यांच्याविषयी प्रेम व भावना व्यक्त करू शकता.

कुकिंग डेट –

जर का तुमच्या वडिलांना स्वयंपाकाची आवड असेल तर त्यांना एखादे स्वयंपाकघरातील उपकरण भेट द्या किंवा काही खास भांडी भेट द्या. फादर्स डे दिवशी तुम्ही दोघेही व्हर्चुअली एकत्र स्वयंपाक करू शकता, जेणेकरुन तुमची वडील नव्या वस्तूंचा वापर करून त्यांचे स्वयंपाक कौशल्य दाखवू शकतील.

व्हर्च्युअल मूव्ही डेट –

साधारणपणे वडिलांना जुने चित्रपट फार आवडतात. असे अनेक चांगले क्लासिक चित्रपट आहेत जे काही ठराविक व्यासपिठावरच उपलब्ध आहेत. अशावेळी तुम्ही तुमच्या वडिलांच्या चित्रपटाचे सबस्क्रिप्शन त्यांना भेट देऊ शकता. अथवा ऑनलाईन अनेक फ्री स्ट्रीमिंग अ‍ॅप्स उपलब्ध आहेत, ज्यांद्वारेही तुम्ही व्हर्चुअली एकत्र चित्रपट पाहू शकता.

व्हर्च्युअल टूर –

बहुतेक देशांमध्ये कोविड-19 मुळे प्रवास करण्यास बंदी आहे. अशा वेळी आपल्या वडिलांना त्यांच्या एखाद्या आवडीच्या ठिकाणची व्हर्च्युअल टूर तुम्ही घडवून आणू शकता.

झूम पार्टी –

फादर्स डे साजरा करण्याचा हा एक सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो. आपल्या वडिलांच्या जवळच्या कुटूंबातील सर्व सदस्यांना, वडिलांच्या जवळच्या मित्रांना झूमद्वारे आमंत्रण पाठवा आणि सर्वजण एकत्र व्हर्च्युअल पार्टी करा.

तर आशा आहे की वर उल्लेख केलेल्या व्हर्च्युअल फादर्स डे सेलिब्रेशनच्या कल्पना तुम्हाला काही खास योजना आखण्यात मदत करतील. तर सर्वांना फादर्स डे 2021 च्या हार्दिक शुभेच्छा.