Happy Dussehra 2020 | (Photo Credits: File Image)

आश्विन शुद्ध दशमीला येणारा सण म्हणजे दसरा (Dussehra).साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणा-या या सणादिवशी शुभकार्य केली जातात. या दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी विशेष मुहूर्ताची गरज नसते. त्यामुळे साखरपुडा, लग्न, बारसे, नवीन घरात गृहप्रवेश अशा अनेक गोष्टी या दिवशी केल्या जातात. त्याचबरोबर नव्या वस्तूंची खरेदी केली जाते. नवविवाहितांसाठी लग्नानंतरचा पहिला दसरा हा खूप खास असतो. आपट्याची पाने देऊन हा दसरा साजरा करतात हे सर्वश्रुत आहे पण नवविवाहित जोडप्यांसाठी त्यांच्या सासरी-माहेरी मानपान देऊन त्यांना दस-याच्या शुभेच्छा दिल्या जातात. त्यावेळी अनेक सुवासिनींना उखाणा (Ukhane) घेण्यासाठी आग्रह केला जातो. अशा वेळी उखाणे पटकन सुचत नाही.

दस-यानिमित्त उखाणा घेताना नेहमीचे उखाणे घेतले की हा जुना आहे असे सांगून नवीन उखाणे घेण्याचा आग्रह केला जातो. अशा वेळी दसरा सणाचे महत्व सांगूनच महिला आपल्या रावांचे नाव घेतील असे काही हटके उखाणे:

1. मोत्यांची माळ, त्यावर सोन्याचा साज

.... रावांचे नाव घेते दसरा आहे आज

2. सासरची मंडळी आहेत खूप हौशी

.... रावांचे नाव घेते दस-याच्या दिवशी

हेदेखील वाचा- Dussehra Special Sweet Recipes: दस-या निमित्त यंदा गुळाची दशमी, कुंदा, कराची हलवा यांसारख्या लज्जतदार रेसिपीजनी वाढवा या सणाचा गोडवा!

3. दसरा सण आहे मोठा

......राव सोबत असताना माझ्या आनंदाला नाही तोटा

4. दस-याच्या दिवशी दारावर बांधले तोरण

....... रावांचे नाव घ्यायला कशाला हवे कारण?

5. हातात घातल्या हिरव्या बांगड्या, गळ्यात घातली ठुशी

..... रावांचे नाव घेते दस-याच्या दिवशी

6. दस-याला केले मी सोळा शृंगार

..... आहे माझे प्रेमळ भरतार

काय मग कसे वाटले उखाणे. यंदा दस-याला उखाणा उखाणा घ्या असा हट्ट केल्यास सुवासिनींना या दिलेल्या उखाण्याची मदत होऊ शकते. शेवटी निमित्त काहीही असले तरी उखाणा घेण्याचा कार्यक्रम हा खूपच मजेशीर आणि आनंददायी असतो. त्यामुळे यंदा दस-याला हे उखाणे या सणाचा गोडवा आणखी वाढवता येईल. नाही का!