खंडोबा यात्रा (फोटो सौजन्य-फेसबुक)

जेजुरीचा खंडोबा (Jejuri Khandoba) हे महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा अनेक ठिकाणच्या भाविकांचे कुलदैवत आहे. दरवर्षी जेजुरीमध्ये खंडोबाचे अनेक कर्यक्रम पार पडतात. त्यामध्ये सोमवती अमावस्येला (Somvati Amavasya) विशेष महत्व आहे. ज्या सोमवारी अमावस्या येते तिला सोमवती अमावस्या म्हणतात. येणाऱ्या 20 जुलै रोजी सोमवती अमावस्या आहे. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जेजुरी येथील सोमवती अमावस्येचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. नुकतीच ग्रामस्थ-मानकरी मंडळाची एक बैठकीत पार पडली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. शिवाय, भाविकांना देवदर्शन बंद करण्यात आले आहे, त्यामुळे सोमवती यात्रेनिमित्त भाविकांनी शहरात येऊ नये, असे आवाहन केले आहे.

सध्या राज्यामध्ये वाढत असलेला कोरोना विषाणूचा धोका जेजुरीलाही जाणवू लागला आहे. जेजुरी हे कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे, त्यामुळे या ठिकाणी कोणतेही सामाजिक कार्यक्रम होणार नाहीत. म्हणूनच 20 जुलैचा सोमवती अमावस्येचा उत्सव रद्द करण्यात आला आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे वाजत-गाजत पालखी खांद्यावर घेऊन कर्‍हा समात्र नित्य सेवेकरी, मानकरी यांच्या हस्ते खंडोबाचे सर्व धार्मिक विधी होणार आहेत. प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून हे धार्मिक विधी होतील.

सोमवती अमावस्या हा दिन नदी स्नानासाठी हा पर्वकाळ मानला जातो. या दिवशी निर्धारित मुहूर्तावर कर्‍हानदी स्नानासाठी खंडोबाची पालखी जेजुरी गडावरून प्रस्थान करते. देव गड उतरून नंदीचौक, गोसावी मठ, छत्री मंदिर, जानाई मंदिर मार्गाने धालेवाडी पालखी रस्त्याने देव नदीवर पोहचतात. या दिवशी रोजमरा वाटून सोमवती उत्सवाची सांगता होते सोमवतीच्या या उत्सव सोहळ्या मध्ये मराठा, धनगर, लोहार, न्हावी, कोल्हाटी, गुरव, वडारी, रामोशी बेलदार, बुरुड, परीट माळी, तेली, मुस्लीम, मातंग, हरिजन तांबट, वाणी वाघे गोंधळी कुंभार, जोशी, खाटिक, ब्राह्मण, शिंपी, सुतार, कोळी, वीर घडशी, चांभार, गोसावी, कासार, सोनार अशा सर्व जातीधर्मातील मानकरी व गावकरी यांचा सहभाग असतो. (हेही वाचा: Somvati Amavasya 2019: जेजुरी गडावर सोमवती अमावस्या निमित्त यात्रेला सुरुवात, भविकांकडून भंडाऱ्याची उधळण)

दरम्यान, जेजुरीत सध्या करोना बाधितांची संख्या वाढत असुन दोन जणांचा मृत्यू झाला आहे. संपुर्ण शहर व परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा जेजुरीमधील 20 जुलै रोजीचा सोमवती अमावस्येचा सोहळा रद्द करण्यात आला आहे.