Photo Credit- X

जेव्हा भारतात जन्मलेल्या महान योद्ध्यांच्या विचार होतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) नाव सर्वात आधी लक्षात येते. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि पहिले छत्रपती होते. त्यांनी आपल्या पराक्रम, युद्धनीती, आणि प्रशासनिक कौशल्याने मराठा साम्राज्याची स्थापना केली. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1930 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे निधन 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर झाले. त्यावेळी त्यांचे वय 50 वर्षे होते. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, महाराष्ट्रात विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन केले जाते. लोक त्यांच्या पराक्रम आणि नेतृत्व गुणांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात.

महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊ त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या बाबी-  

जन्म आणि बालपण:

शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील शहाजी भोसले हे विजापूरच्या आदिलशाही सल्तनतचे सेनापती होते, आणि आई जिजाबाई या धार्मिक आणि धैर्यशील महिला होत्या. त्यांच्या आईने त्यांच्यावर रामायण आणि महाभारताच्या कथांचे संस्कार केले, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर लहानपणापासूनच देशभक्ती आणि न्यायप्रियतेचे बीज रोवले गेले.

स्वराज्याची स्थापना:

शिवाजी महाराजांनी 16 वर्षांच्या अल्पवयात तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी पुढे मावळातील अनेक किल्ले जिंकून आपले राज्य विस्तारले. त्यांनी 'हिंदवी स्वराज्य' या संकल्पनेखाली मराठा साम्राज्याची स्थापना केली. पुढे 1674 साली रायगड किल्ल्यावर बनारसचे विद्वान पंडित गागाभट्ट यांच्याद्वारे त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती म्हणून घोषित झाले. ​

लष्करी कौशल्य आणि युद्धनीती:

शिवाजी महाराज त्यांच्या लष्करी कौशल्य आणि गनिमी काव्याच्या तंत्रासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी प्रतापगडच्या लढाईत अफजल खानाचा पराभव केला, ज्यामुळे त्यांच्या शौर्याची ख्याती दूरवर पसरली. त्यांनी नौदलाची स्थापना करून सागरी सुरक्षा मजबूत केली आणि कोकण किनारपट्टीवरील सिद्दी, पोर्तुगीज आणि डच यांच्याशी यशस्वीपणे सामना केला. त्यांनी कोकण किनाऱ्यावर सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे सागरी किल्ले बांधले. (हेही वाचा: Swami Samarth Prakat Din Date: यंदा 31 मार्चला साजरा होणार स्वामी समर्थ प्रकट दिन)

मुघलांविरुद्ध मोठे विजय:

महाराजांना 1665 मध्ये पुरंदर तहानंतर काही किल्ले गमवावे लागले, परंतु काही वर्षांतच महाराजांनी पुन्हा हल्ला चढवून अनेक किल्ले परत जिंकले. 1670 मध्ये सिंहगड किल्ला तानाजी मालुसरे यांच्या शौर्याने परत मिळवला. याच दरम्यान त्यांनी सुरतची लूट केली, ज्यामुळे मुघलांना मोठा आर्थिक फटका बसला. यासह त्यांनी दक्षिण भारतात मोठ्या मोहिमा राबवल्या आणि कर्नाटक, तंजावर, जिंजी भागात मराठा सत्ता प्रस्थापित केली.

धर्मनिरपेक्षता आणि प्रशासन:

त्यांच्या राज्यात धार्मिक सहिष्णुता होती. शिवाजी महाराजांनी सुसंगत आणि न्यायप्रिय प्रशासन व्यवस्था निर्माण केली. त्यांनी आठ मंत्र्यांची 'अष्टप्रधान' परिषद स्थापन केली, ज्याद्वारे राज्यकारभार सुरळीतपणे चालवला जात असे. त्यांनी शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हितासाठी अनेक सुधारणा केल्या आणि त्यांना संरक्षण दिले. महिलांचा सन्मान, शेतकऱ्यांचे हित आणि सामान्य जनतेच्या संरक्षणासाठी त्यांनी अनेक सुधारणा केल्या. त्यांनी लुटालूट, स्त्रीशोषण आणि अन्यायाविरुद्ध कठोर कायदे लागू केले.

3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे निधन झाले. त्यांचा वारसा पुढे संभाजी महाराज आणि इतर मराठा सरदारांनी पुढे नेला आणि मराठा साम्राज्याला पुढील काही दशकांत अफाट वाढ मिळाली. आजही भारतभर शिवाजी महाराजांचा आदराने उल्लेख केला जातो आणि त्यांचे नाव अभिमानाने घेतले जाते. त्यांचे जीवन हे शिस्त, निडरता, राष्ट्रनिष्ठा आणि आदर्श राज्यकारभार यांचे प्रतीक आहे.