Makar Sankranti Special Ukhane (फोटो सौजन्य - File Image)

Makar Sankranti Special Ukhane: मराठी संस्कृतीत उखाण्याला खूप महत्त्व आहे. उखाणे (Ukhane) हे महाराष्ट्राची,मराठी भाषेची,मराठी मातीची अस्सल खूण आहे. लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर स्त्रियांना आपल्या नवऱ्याचे नाव घेण्याची परंपरा वर्षांनुवर्ष चालत आली आहे. अनेक लग्नसमारंभात किंवा पूजेच्या वेळी नाव घेण्याची परंपरा आहे. नवीन जोडप्यांकडून उखाणे ऐकणं तर सर्वांनाचं आवडतं. याशिवाय, महाराष्ट्रात असे अनेक प्रसंग आहेत, ज्यावेळी स्त्रियांना नाव घेण्यास म्हणजेचं उखाणा घेण्याचा आग्रह केला जातो.

मंगळवारी, देशभरात मकर संक्रातीचा (Makar Sankranti 2025) सण साजरा होत आहे. या सणानिमित्ताने विवाहित महिला हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. या कार्यक्रमात महिला एकमेकींना उखाणा घेण्याचा आग्रह करतात. विशेषत: नवविवाहित महिलेच्या उखाण्याकडे सर्वांचे लक्ष असते. त्यामुळे तुम्ही देखील मकर संक्रांती निमित्त उखाणे घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास आणि हटके उखाणे घेऊन आलो आहोत. तुम्ही हे उखाणे घेऊन सासरच्या मंडळींची आणि तुमच्या मैत्रिणींची मनं नक्कीचं जिंकू शकता. (हेही वाचा - Makar Sankranti 2025 Easy Rangoli Designs: मकर संक्रांतीनिमित्त झटपट काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाइन,पाहा व्हिडीओ)

मकर संक्रांतीसाठी मराठी उखाणे -

  • ते उडवत होते पतंग, आणि मी पकडली होती फिरकी,

    _______ रावांच्या मागे, सात जन्म अशीच घेईन मी गिरकी

  • मकर संक्रांतीला, काळ्या कापडाला फार आहे डिमांड,

    ________ राव माझे सर्व हट्ट पूर्ण करा, नाहीतर सर्वांसमोर घेते रिमांड

  • हलव्याचे दागिने, त्यावर काळी साडी,

    नेहमी खुश राहो _____ आणि ______ ची जोड

  • मकर संक्रांतीला असतो, हलव्याच्या दागिन्यांना मान,

    ________ रावांचे नाव घेऊन देते, हळदी कुंकूचे वाण

  • मकर संक्रांतीला, काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड,

    ________ राव माझे पती नाहीत, तर आहेत बेस्ट फ्रेंड.

  • लग्नानंतर मकर संक्रातचा पहिला सण करते साजरा,

    ________ रावांचा स्वभाव, आहे फार लाजरा.

  • तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,

    ________ रावांचे नाव घेण्याचे, सौभाग्य मला

  • चांदीच्या दिव्यात लावली तूपाची वात

    ________ रावांचे नाव घेत करते हळदी कुंकवाला सुरूवात

  • हलव्याचे दागिने, काळ्या कपड्यावर दिसतात उठून,

    सर्वजण विचारतात ________ हॅंडसम, भेटले कुठून.

महाराष्ट्रात मकर संक्रातीला विवाहित महिला हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करतात आणि एकमेकींना वाण देतात. मकर संक्रातीचा दिवस विवाहित महिलांसाठी खूपचं खास असतो. या दिवशी त्या आपल्या पतीसाठी आणि कुटुंबासाठी प्रार्थना करता. ज्या दिवशी सूर्य देव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो.