
मराठी महिन्यातील १२ महिन्यांपैकी आषाढ महिन्यास विशेष महत्व आहे. आषाढ महिन्यापासूनच मराठी सणांची सुरुवात होते. आषाढ वारीचा समारोप विठ्ठलचरणी आषाढ एकादशीला होतो आणि मराठी सणांची सुरुवात होते. आषाढ पौर्णिमा म्हणचे गुरुपौर्णिमा, नागपंचमी, रक्षाबंधन,नारळी पौर्णिमा या सणांची चाहूल लागते. तसेच आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थीला पंचांगात विशेष महत्व आहे.
शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते. गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी हा दिवस पाळला जातो. यावर्षी आषाढ विनायक चतुर्थी रविवार, 03 जुलै रोजी येत आहे. या शुभ दिवशी, हिंदू भाविक भगवान गणेशाची पूजा करतात आणि भगवानाला प्रसन्न करण्यासाठी दिवसभर उपवास करतात. या चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि हा दिवस माणसाच्या जीवनात सुख-समृद्धी घेऊन येतो. विनायक चतुर्थीच्या दिवशी पुण्य आणि फलप्राप्तीसाठी पुजेदरम्यान गणेशाची आरती आणि अथर्वशीर्ष पठन केल्यास अधिक लाभदायक ठरते. ( हे ही वाचा :- Ganeshotsav 2022 Special Trains: गणेशभक्तांचा प्रवास सुखद होणार, गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंकडून घोषणा)
आषाढ विनायक चतुर्थी मुहुर्त:-
पंचांगानुसार, आषाढ विनायक चतुर्थी चतुर्थी तिथी 2 जुलै रोजी दुपारी 3.16 मिनिटांनी सुरु होणार असुन 3 जुलैला सायंकाळी 5.06 समाप्त होईल. गणेश पूजा दुपारी केली जात असल्याने विनायक चतुर्थी, रविवारी सकाळी 11:02 ते दुपारी 01:49 पर्यंत पूजेच्या शुभ मुहूर्त असेल.
या पध्दतीने गणेशाची पुजा केल्यास होणार इच्छापूर्ती :-
सूर्योदयापूर्वी लवकर उठून आंघोळ करुन स्वच्छ नवीन लाल कपड्यावर गणेशाची मूर्ती ठेवा आणि ताजी फुले आणि ध्रुव गवताने सजवा. देवासमोर दीवा लावून गणेशाची आरती करा. देवाला मिठाई, फूल, चंदन अर्पण करा. त्यानंतर सूर्याला अर्घ्य देऊन उपवास सुरू करा. आषाढ विनायक चतुर्थी पहाटे 05:28 ते 06:30 पर्यंत सिद्धी योग असेल तर दिवसाची शुभ वेळ सकाळी 11:57 ते दुपारी 12:53 दरम्यान आहे.
आषाढ विनायक चतुर्थीचं विशेष महत्व काय?
इतर कोणत्याही देवाच्या आधी हिंदू परंपरेत, भगवान गणेशाची नेहमी पूजा केली जाते. तर आषाढ महिन्यापासून मराठी सणांची सुरुवात होते म्हणून आषाढ विनायक चतुर्थीला विशेष महत्व आहे. गणेशाला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते, असे मानले जाते की कोणत्याही गोष्टीची सुरुवात गणेशाच्या आशीर्वादाने केल्यास मार्गातील सर्व अडथळे दूर होतात. परमेश्वराचा आदर आणि भक्ती करण्यासाठी लोक दर महिन्याला एक दिवस उपवास करतात आणि गणपतीची प्रार्थना करतात.
(टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देश्याने लिहण्यात आलेला आहे. लेटेस्टली मराठी या मजकूराची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही.)