अपरा एकादशीचं (Apara Ekadashi) व्रत ज्येष्ठ कृष्ण पक्षातील एकादशी दिवशी ठेवलं जातं. यावर्षी हे व्रत सोमवार, 18 मे दिवशी आहे. त्यामुळे भागवत संप्रादयातील भाविकांसाठी 18 मेचा दिवस खास असेल. अपरा एकादशी ही अचला एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. धार्मिक मान्यतानुसार, जी व्यक्ती अपरा एकादशी किंवा अचला एकादशीचा उपवास करते त्या व्यक्तीला भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा आशिर्वाद मिळतो. त्यांच्या आशिर्वादामुळे सारा आशा आकांक्षा पूर्ण होतात असे सांगितलं जातं.
अपरा / अचला एकादशी दिवशी एकादशीचा उपवास ठेवत भगवान विष्णूचं स्मरण केलं जातं. संध्याकाळी विष्णूच्या फोटोसमोर गायीच्या तूपाचा दिवा लावून पूजा करावी. विष्णूसहस्त्र नामावलीचं पठण केलं जातं. ब्राम्हणांना दान-दक्षिणा दिली जाते. लोकांना प्रसाद दिला जातो.
अपरा एकादशी 2020 चा मुहूर्त
एकादशी तिथि प्रारंभ - 17 मे 2020 दिवशी 12:44 वाजता
एकादशी तिथि समाप्त - 18 मे 2020 दिवशी 15:08 वाजता
अपरा एकादशी पारणा मुहूर्त - 19 मे 2020 दिवशी सकाळी 05:27:52 पासून 08:11:49 वाजेपर्यंत सुमारे 2 तास 43 मिनिटं असेल.
अपरा एकादशी दिवशी विनाकरण खूप काळ अंथरूणात लोळत पडणं टाळा, तामसिक, तिखटाचं जेवण टाळा. आहारात लसूण, कांदा टाळा. एकादशी दिवशी भात टाळून द्वादशीला उपवास सोडताना भाताचं सेवन करावं.
पुराणात असं सांगितलं जातं की, श्रीकृष्णाने युद्धिष्ठीराला सांगितलं होतं की अपरा एकादशी पुण्य देणारी आहे. अनेक मोठ्या पापांचादेखील नाश होतो आणि लोकांचा विष्णू लोकामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होतो.