Miss England Milla Magee

मिस इंग्लंड 2024 मिला मॅगीने (Miss England Milla Magee) तेलंगणाच्या हैदराबाद येथे सुरू असलेल्या मिस वर्ल्ड 2025 (Miss World 2025) स्पर्धेतून अचानक माघार घेतली आहे, ज्यामुळे जागतिक सौंदर्य स्पर्धांच्या नैतिकता आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 24 वर्षीय मिला हिने स्पर्धेच्या आयोजकांवर गंभीर आरोप केले आहेत. तिने दावा केला की, या ठिकाणी स्पर्धकांना एखाद्या वस्तूसारखे वागवले गेले आणि त्यांना श्रीमंत पुरुष प्रायोजकांचे मनोरंजन करण्यासाठी सक्ती करण्यात आली, ज्यामुळे तिला अगदी ‘वेश्यासारखे’ वाटले. मॅगी हिने 7 मे रोजी हैदराबाद येथे स्पर्धेच्या प्रचारात्मक कार्यक्रमांसाठी प्रवेश केला होता, परंतु 16 मे रोजी ती स्पर्धेतून बाहेर पडली. याबाबत सुरुवातीला ‘वैयक्तिक कारणे’ असे सांगण्यात आले. मात्र आता मॅगीने अनेक गोष्टींबाबत आपले मौन सोडले आहे.

मिस वर्ल्डच्या 74 वर्षांच्या इतिहासात मिस इंग्लंडने स्पर्धेतून माघार घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. मॅगी हिच्या माघारीनंतर मिस इंग्लंड उपविजेती शार्लट ग्रँट हिने इंग्लंडचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हैदराबादेत प्रवेश केला आहे. मिला मॅगी ही गेल्या वर्षी मिस इंग्लंड म्हणून विजेती ठरली होती. त्यानंतर तिने मिस वर्ल्ड 2025 मध्ये ‘ब्युटी विथ अ पर्पज’ या संकल्पनेखाली सामाजिक बदल घडवण्याच्या उद्देशाने भाग घेतला होता. तिच्या ‘गो फार विथ सीपीआर’ मोहिमेला प्रिन्स विल्यम यांच्यासह अनेकांचा पाठिंबा मिळाला होता, ज्याचा उद्देश शाळा आणि कामाच्या ठिकाणी सीपीआर आणि प्रथमोपचार प्रशिक्षण अनिवार्य करणे आहे.

यासह ती पर्यावरण संरक्षण आणि सर्फर्स अगेन्स्ट सिवेज या संस्थेच्या माध्यमातून समुद्र प्रदूषणाविरुद्ध लढत आहेत. मॅगी हिने मिस वर्ल्डच्या व्यासपीठाचा उपयोग या मोहिमांना व्यापक स्तरावर पोहोचवण्यासाठी करायचा होता, परंतु तिला स्पर्धेचे वातावरण तिच्या मूल्यांशी आणि अपेक्षांशी विसंगत वाटले. मॅगीने सांगितले की, स्पर्धकांना सकाळपासून रात्रीपर्यंत मेकअप आणि बॉल गाऊन घालण्यास सांगितले जायचे, अगदी नाश्त्याच्या वेळीही. त्यांना सतत ‘सुंदर दिसण्यावर’ लक्ष केंद्रित करण्यास सांगितले जायचे, ज्यामुळे तिला आपण एखादी वस्तू असल्याचे वाटले. मॅगीने दावा केला की, स्पर्धकांना श्रीमंत पुरुष प्रायोजकांच्या टेबलवर सहा अतिथींसह बसण्यास आणि त्यांचे संपूर्ण संध्याकाळ मनोरंजन करण्यास सांगितले गेले. मॅगीने याला ‘अस्वीकार्य’ आणि ‘अपमानजनक’ म्हटले. ती म्हणाली, ‘मी येथे मनोरंजनासाठी आले नाही, तर बदल घडवण्यासाठी आले होते.’

मॅगीने उघड केले की, एका महिला अधिकाऱ्याने 109 अंतिम स्पर्धकांपैकी काहींना एका कार्यक्रमात ‘कंटाळवाणे’ असल्याची टीका केली. यामुळे स्पर्धकांप्रती आदराचा अभाव दिसून आला. तिने सांगितले की, ‘ब्युटी विथ अ पर्पज’ ही घोषणा केवळ नावापुरती आहे, आणि स्पर्धा केवळ बाह्य सौंदर्यावर केंद्रित आहे. तिने तिच्या सामाजिक मोहिमांबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रायोजकांना त्यात रस नव्हता. यामुळे मॅगीने नैतिक दृष्टिकोनातून स्पर्धेत सहभागी राहणे शक्य नसल्याचे सांगितले. तिला आपल्या मूल्यांशी तडजोड करायची नव्हती. (हेही वाचा: Fashion Show in Gulmarg: रमजान दरम्यान गुलमर्गमधील फॅशन शोमुळे वाद; Omar Abdullah यांनी दिले कारवाईचे आश्वासन)

मॅगीने ठामपणे सांगितले, ‘मिस वर्ल्डला बदलण्याची गरज आहे. तुमच्या आवाजाचा वापर करून बदल घडवणे महत्त्वाचे आहे. मॅगीने ब्रिटिश वृत्तपत्र ‘द सन’ला दिलेल्या मुलाखतीत स्पर्धेतून माघार घेण्याची ही कारणे उघड केली. यामुळे स्पर्धेच्या आयोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, मिस वर्ल्ड 2025 ही स्पर्धेची 72 वी आवृत्ती आहे, जी 7 मे ते 31 मे 2025 दरम्यान हैदराबाद, तेलंगणा येथे आयोजित केली जात आहे. ही स्पर्धा भारतात तिसऱ्यांदा होत आहे, यापूर्वी 1996 आणि 2024 मध्ये ती आयोजित झाली होती. 108 देश आणि प्रदेशांमधील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत, आणि अंतिम कार्यक्रम हायटेक्स प्रदर्शन केंद्रात 31 मे रोजी होईल.