Largest Luxury Mall of India: मुंबईत रिलायन्स उघडणार देशातील सर्वात मोठा लक्झरी मॉल 'Jio World Plaza'; 1 नोव्हेंबरपासून सुरू, जाणून घ्या सविस्तर
Mukesh Ambani | (File Image)

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) 1 नोव्हेंबर रोजी देशातील सर्वात मोठा लक्झरी शॉपिंग मॉल (Largest Luxury Mall) उघडणार आहे. कंपनीचा हा मॉल मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 7,50,000 स्क्वेअर फूट परिसरात पसरलेला आहे. या मॉलमध्ये बुल्गारी, कात्याय, लुई व्हिटॉन, व्हर्साचे, व्हॅलेंटिनो, मनीष मल्होत्रा, अबू जानी, संदीप खोसला, पॉटरी बार्न, गुच्ची आणि इतर अनेक महागडे ब्रँड्स उपलब्ध असतील.

हे बुल्गारीचे भारतातील पहिले स्टोअर असेल. सध्या भारतात काही मोजकेच मॉल्स आहेत जिथे आलिशान आणि महागड्या वस्तू मिळतात. यामध्ये डीएलएफ एम्पोरियो, चाणक्य मॉल, यूबी सिटी आणि पॅलेडियम यांचा समावेश आहे. पूर्वी काही महागडे ब्रँड पंचतारांकित हॉटेल्समध्ये असायचे. मात्र आता रिलायन्सद्वारे देशातील पहिला लक्झरी ब्रँड्सला समर्पित मॉल सुरु केला जात आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतात महागड्या वस्तूंकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे आणि त्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. कोविड साथीच्या आजारानंतरच्या काही वर्षांत तर त्यांची मागणी लक्षणीय वाढली आहे. या आधी भारतामधील लोक लक्झरी शॉपिंगसाठी परदेशात जायचे, मात्र आता देशातही अशा लक्झरी वस्तू उपलब्ध होत आहेत. भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमतीतील तफावतही कमी झाली आहे. (हेही वाचा: जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती होणार Mukesh Ambani यांचा भाडेकरू; दरमहा देणार लाखोंचे भाडे, घ्या जाणून)

स्टॅटिस्टाच्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये देशातील महागड्या वस्तूंची बाजारपेठ 7.74 अब्ज डॉलर्सची होती. त्याचा आकार वार्षिक आधारावर 1.38 टक्के (CAGR 2023-2028) दराने वाढण्याचा अंदाज आहे. आकडेवारीनुसार, लक्झरी घड्याळे आणि दागिने हे भारतातील महागड्या वस्तूंमध्ये सर्वात मोठे विभाग आहेत ज्यांची बाजारपेठ 2023 मध्ये $2.24 अब्ज होती.