Jio World Plaza: जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती होणार Mukesh Ambani यांचा भाडेकरू; दरमहा देणार लाखोंचे भाडे, घ्या जाणून
Mukesh Ambani (Photo Credit - PTI)

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानी (Mukesh Ambani), त्यांचा पुढचा मोठा प्रकल्प घेऊन येत आहेत. हा प्रकल्प आहे भारतातील सर्वात मोठा लक्झरी मॉल. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये हा मॉल सुरू होणार आहे व या मॉलला जिओ वर्ल्ड प्लाझा (Jio World Plaza) म्हणून ओळखले जाईल. रिपोर्ट्सनुसार, या मॉलमध्ये अनेक लक्झरी ब्रँड्सनी त्यांच्या नवीन स्टोअरसाठी आधीच अनेक दुकाने भाडेतत्त्वावर घेतली आहेत. त्यापैकी एक आहेत जगातील दुसरे श्रीमंत उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault). सोप्या भाषेत सांगायचे तर, बर्नार्ड अर्नॉल्ट हे मुकेश अंबानींचे भारतात भाडेकरू असतील.

इथल्या दुकानासाठी ते मुकेश अंबानींना दरमहा 40 लाख रुपयांहून अधिक भाडे देणार आहेत. फोर्ब्सच्या मते, जगातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट यांची एकूण संपत्ती 174 अब्ज डॉलर्स आहे. बर्नार्ड अर्नॉल्ट हे Moët Hennessy Louis Vuitton (LVMH) चे सीईओ आणि अध्यक्ष आहेत. हा एक फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समूह आहे, जो लक्झरी उत्पादने तयार करतो. LVMH च्या प्रीमियम ब्रँड्समध्ये लुई व्हिटॉन, टिफनी अँड कंपनी, डीओर, गिव्हेंची, टॅग ह्युअर आणि बुल्गारी यांचा समावेश आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांचा हा जिओ वर्ल्ड प्लाझा मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरातील सर्वात पॉश भागात असेल. लुई व्हिटॉनने मुकेश अंबानींच्या जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये चार दुकाने लीजवर घेतली आहेत. या दुकानांचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 7,365 चौरस फूट आहे. रिपोर्टनुसार, हे भारतातील सर्वात मोठे स्टोअर असेल. यासाठी मुकेश अंबानींना एलव्ही दर महिन्याला 40.50 लाख रुपये भाडे देईल. (हेही वाचा: Nokia Layoffs: नोकियामध्ये तब्बल 14,000 लोकांच्या नोकऱ्या जाणार; विक्री घसरल्यानंतर खर्च कमी करण्याची तयारी सुरू)

आतापर्यंत लुई व्हिटॉनचे भारतात तीन स्टोअर्स आहेत. मुंबईतील ताजमहाल पॅलेस आणि टॉवरमध्ये एक स्टोअर आहे. दुसरे स्टोअर यूबी सिटी, बंगलोर येथे आहे. तिसरे स्टोअर नवी दिल्लीतील डीएलएफ एम्पोरियोमध्ये आहे. मिंटच्या अहवालानुसार, ख्रिश्चन डायरने जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये 3,317 स्क्वेअर फूटचे दोन युनिट्स 21.56 लाख रुपये मासिक भाड्याने घेतले आहेत. यासह रॉयटर्सच्या मते, Burberry, Gucci, Cartier, Bulgari, IWC Schaffhausen आणि Rimowa (भारतातील पहिले आउटलेट) यांनी देखील जिओ वर्ल्ड प्लाझा येथे दुकाने भाड्याने घेण्याचे मान्य केले आहे, जे यावर्षी उघडण्याची शक्यता आहे.