Shankar (Photo Credits: PixaBAY)

देवांचा देव महादेव म्हणून ज्याला संबोधले जाते, त्या भगवान शंकराचे (Lord Shiva) माहात्म्य सांगावे तेवढे कमीच. महादेव म्हणजेच सर्वात महान देव म्हणून देखील शंकराला ओळखले जाते. त्यांचे केस मनाचे प्रतिक मानतात, त्यांचे त्रिशूल मनावर नियंत्रण करतो, त्यांचे ध्यान शांततेचे प्रतिक आहे आणि त्यांच्या गळ्यातील सर्प हा आपला अहंकार त्याग करण्याचे प्रतिक आहे. अशा या महान देवाची मनोभावे पूजा करून त्याची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी यासाठी भाविक आपल्या जमेल तशी शंकराची पूजा अर्चा करतात.

पण ही पूजा करत असताना अशा काही गोष्टी आहेत ज्या भगवान शंकराला अर्पण करणे शुभ मानले जात नाही असे पुराणात म्हटले आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 7 गोष्टी:

1. शंख - शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असूराचा वध केला होता. तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते.

2. हळद कुंकू- भगवान शंकर आजन्म वैरागी होते. त्यामुळे श्रृंगाराशी संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही. हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते. त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही. या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात.

3. तुळशी पत्र - असूरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती. भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता. त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता.

4. नारळ पाणी - नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरांवर अभिषेक केला जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रुप मानले जाते. म्हणून शुभकार्यात नारळाचा वापर प्रसाद म्हणून केला जातो.

5. उकळलेले दूध - उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये. त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा. बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते. त्यामुळेच त्याचा वापर करणेही टाळावे.

(हेही वाचा-  श्रीविष्णू चा सहावा अवतार 'परशुराम' विषयी जाणून घ्या या खास गोष्टी)

6. केवड्याचे फूल - भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे. शिव पुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता.

7. कुंकू किंवा शेंदूर - कुंकू किंवा शेंदूराचा वापरही भगवान शंकरांची पूजा करण्यात वर्ज्य केला आहे.

भगवान शंकरावर ज्याची अपार श्रद्धा आहे, ते त्याची मनोभावे पूजा करण्यासाठी अनेक पूजा, उपास-तापास करतात. शेवटी देवाची मनोभावे भक्ती करणे महत्त्वाचे.