प्रतिकात्मक फोटो (Photo Credit : Pixabay)

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या आनंदापेक्षा मुलांच्या सुट्ट्यांचे टेन्शन पालकांना अधिक असते. कारण मुलं घरात असली की दंगा, पसारा करणार. मग त्यांच्याकडे लक्ष द्या ओघाने ओरडा या सगळ्या गोष्टी त्यात आल्याच. मग मुलं शांत बसावी म्हणून टीव्ही लावून दिला जातो किंवा मोबाईल हातात सोपवला जातो. पण मुलांना शांत बसवण्याचा हा एकच मार्ग आहे का?

15-20 दिवसांच्या सुट्टीत मुलं काहीतरी नवी शिकू शकतील. त्यांच्यातील कला ओळखू शकतील. त्यांच्या सुट्ट्या एन्जॉय करु शकतील. पण त्यासाठी नेमकं काय करणं गरजेचे आहे? तर मुलांच्या सुट्ट्यांचा सदुपयोग करण्यासाठी काही खास टिप्स....

दिवाळी कॅम्प्स

दिवाळी कॅम्प्सला गेल्याने हाती असलेला मोकळा वेळ सत्कारणी लागेल. त्याचबरोबर मुलांना नव्या गोष्टी शिकता येतील. नवीन ओळखी होतील. कॅम्प्समधील विविध उपक्रमांमुळे मुलांचे मन त्यांच्या आवडीच्या गोष्टीत रमेल. त्यांच्यात सकारत्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होईल.

हॉबी क्लासेस

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना व्यस्त ठेवण्याचा उत्तम उपाय म्हणजे त्यांना हॉबी क्लासमध्ये घालणे. प्रत्येक मुलाला एका विशिष्ट गोष्टीत अधिक रस असतो. उदा. नाचणे, गाणे, चित्र काढणे, इत्यादी. मुलांमध्ये असलेल्या कलेची त्यांना स्वतःला जाणीव होण्याची ही योग्य वेळ आहे. हॉबी क्लासेसमध्ये गेल्याने त्यांना त्यांच्यातील छुप्या कलेची जाणीव होण्यास नक्कीच मदत होईल. त्याचबरोबर त्यांना नव्या गोष्टी शिकता येतील.

फॅमेली ट्रिप

मुलांना सतत शिकवण्या किंवा उपदेश देण्याइतकेच त्यांच्या सोबत चांगला मजेशीर वेळ घालवणे देखील महत्त्वाचे आहे. वर्षभर कामाच्या गडबडीत अनेकदा मुलांसोबत वेळ घालवायला सवड मिळत नाही. मग दिवाळीची सुट्टी ही एक उत्तम संधी आहे. तर मग तुम्ही ऑफिसमधून सुट्टी घ्या आणि कुटुंबासोबत मस्त फिरायला जा. एखादी गोष्ट/जागा पुस्तकात, टी.व्हीवर पाहण्यापेक्षा प्रत्यक्षात अनुभवणं फार शिकवणार असतं. म्हणूनच मुलांसोबत नवनव्या ठिकाणी फिरायला जा. त्यामुळे तुम्हाला मुलांसोबत वेळही घालवता येईल आणि छान आठवणी तयार होतील.

मुलांसोबत खेळा

मुलांसोबत खेळण्यासारखा दुसरा आनंद नाही. आणि तुम्हाला कल्पना नसेल पण मुलांनाही यातून खूप आनंद मिळतो. यामुळे मुलं अधिक अॅक्टीव्ह, स्मार्ट तर होतातच. पण त्याचबरोबर पालक आणि मुलांमधील नाते अधिक घट्ट होण्यास मदत होते.

मुलांचे छंद जोपासण्यासाठी

मुलाला जर एखाद्या गोष्टीची विशेष आवड असेल म्हणजेच स्विमिंग, स्केचिंग, ग्राडनिंग तर त्या क्लासेस घालणे उत्तम ठरेल. मुलांना जर वाचनाची आवड असेल तर त्यांना नवनवीन पुस्तके आणून द्या किंवा लायब्ररी जॉईन करा.

त्याचबरोबर तुम्हाला मुलांना काही गोष्टी शिकवायच्या असतील- उदा. कुकिंग, बँकेची कामे किंवा इतर काही गोष्टी तर तुम्ही हा सुट्ट्यांचा वेळ त्यासाठी नक्कीच वापरु शकता.