येत्या 8 मार्चला जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's Day) साजरा केला जाईल. महिलांच्या सन्मानार्थ त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्याचा हा दिवस. 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून साजरा केला जातो. आज महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलत आहे. या पुरुषप्रधान समाजात महिलांनाही तोच आदर, मान, सन्मान दिला जात आहे जो एका पुरुषाला मिळतो. मात्र महिलांची ही लढाई सोपी नव्हती, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून परिस्थीचा सामना करण्याऱ्या महिलेच्या कर्तुत्वाचे चीज होण्यास फार कालावधी लागला. ‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते’ असे म्हणतात, मात्र फक्त यशस्वी पुरुषाच्या मागेच नाही तर जीवनाच्या प्रत्येक वळणार हीच स्त्री कधी आई बनून, कधी बहिण बनून, कधी पत्नी बनून तर कधी मैत्रीण बनून आपल्या पाठीशी उभी असते.
महिला दिनानिमित्त स्त्रियांवर, त्यांच्या कर्तुत्वावर खूप काही लिहिले जाईल, भाषणे, चर्चासत्रे होतील मात्र खरच तुम्हाला या महिलांबद्दल आदर व्यक्त करायचा असेल तर तो तुमच्या कृतीतून व्यक्त करा. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात कोणी ना कोणी स्त्री नक्कीच असेल, या महिलादिनानिमित्त त्या स्त्रीला तुमचे एखादे गिफ्ट त्या महत्वाच्या स्त्रीच्या ओठावर आनंदाचे हसू नक्कीच घेऊन येऊ शकते. यासाठी आम्ही काही खास, युनिक गिफ्ट आयडियाज देत आहोत, ज्या सर्वसाधारणपणे प्रत्येक स्त्रीला आवडू शकतील.
गॅजेट्स– आज आपण तंत्रज्ञानाच्या हातातील बाहुले झालो आहोत. संपूर्ण जग अवघ्या एका क्लिकच्या अंतरावर आले आहे. मात्र कदाचित तुमची आई अजूनही या विश्वापासून दूर असेल तर तिच्यासाठी स्मार्टफोन, किंडल, चांगले हेडफोन, टॅब, स्मार्टवॉच, यांसारखे गॅजेट्स गिफ्ट करू शकता.
मेकअप कीट- पूर्वीच्या काळी साधी लिपस्टिक लावायची असेल तर स्त्रियांना दहा वेळा विचार करावा लागत असे, मात्र हल्लीच्या स्त्रिया मेकअप केल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे अगदी उत्तम गुणवत्तेचा मेकअप कीट तुम्ही तुमची आई, बहिण अथवा पत्नीला देऊ शकता. तसेच स्वतः त्यांना पार्लरमध्ये घेऊन जाऊन मेकओव्हर देखील घडवू शकता.
गुंतवणूक- या महिलादिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या स्त्रीच्या नावाने काही गंतवणूक करा. एखादा विमा, शेअर्स, एफडी जितकी आणि जशी शक्य होईल तितकी रक्कम तुम्ही या गोष्टींमध्ये गुंतवू शकता. (हेही वाचा: WWE मधील कमी वयात सूपरस्टार झालेल्या टॉप 3 महिला रेसलर)
पासेस- महिलांच्या पायाला 24 तास भिंगरी बांधलेली असते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कामाच्या रहाटगाड्याला ती जुंपलेली असते. त्यामुळे एक दिवस तरी तिला तिचा दिवस मोकळेपणाने व्यतीत करता यावा म्हणून तुम्ही तिला मनोरंजन पार्क, विविध मैफिली, एक दिवसाची सोलो ट्रीप अशा गोष्टींचे पासेस देऊ शकता.
छंद – आपल्या प्रत्येकामध्ये एक कलाकार दडलेला असतो, मात्र बरेचदा कामाच्या व्यापात या कलेकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे या महिलादिनी तुमच्या आयुष्यातील महिलेच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव द्या. पेंटिंग, शिवणकाम, भरतकाम किंवा जी कोणती कला आहे त्याच्याशी निगडीत असलेले साहित्य तुम्ही भेट म्हणून देऊ शकता, त्यासंदर्भातील एखादा कोर्स असेल तर त्याच्यासाठी नावनोंदणी करू शकता.