खराब वातावरणातील निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवल्याने स्विगी, फूडपांडा, झोमॅटोला नोटीस
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : pixabay)

डिजिटल क्षेत्रातील क्रांतीमुळे आजकाल घरात जेवण बनवने हे दुरापास्त झाले आहे, आणि याची जागा घेतली आहे ती ‘ऑनलाईन फूड’ने. जेवणातील विविधतेसह जर का तुम्हाला शेकडो पर्याय आपल्या बजेटमध्ये मिळत असतील, तर कोण ऑनलाईन फूड ऑर्डर करणार नाही? मात्र कधी कधी या जेवणाचा दर्जा निकृष्ट वाटतो किंवा चव बिघडलेली असते. मात्र आपण याकडे दुर्लक्ष करतो. याच मुद्यावरून ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपन्यांना एफएसएसएआईने (FSSAI) नोटीस पाठवली आहे. यामध्ये स्विगी, फूडपांडा, झोमॅटो, उबर ईट्स यांचा समावेश आहे. तपासणीमधून या कंपन्या अस्वच्छ वातावरणातील खाद्यपदार्थ ग्राहकांना पुरवीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ग्राहकांना हलक्या प्रतीचे अन्न पुरवले जात असल्याची तक्रार नेहमीच केली जाते. मात्र कंपन्या यावर कोणतीही भूमिका घ्यायला तयार नव्हते. म्हणून जुलैमध्ये FSSAIकडून या ऑनलाईन कंपन्यांना अन्न नियमन खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा परवाना नाही अशा रेस्टॉरंट्सकडून खाद्यपदार्थ घेऊ नयेत असे सांगितले होते. त्यानंतर जेव्हा वेगवेगळ्या शहरांतून तपासणी करण्यात आली तेव्हा फूड कंपन्या ग्राहकांना अतिशय खराब वातावरणात तयार होणारे निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवीत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता तब्बल 10.500 रेस्टॉरंट्सना अशा ऑनलाईन कंपन्यांनी आपल्या यादीमधून वगळले आहे.

ऑनलाईन दिसणाऱ्या रेस्टॉरंट्सपैकी जवळजवळ 30-40 टक्के रेस्टॉरंट्स हे विनापरवाना चालू आहेत. झोमॅटोने 2,500, स्विगीने 4,000, फूडपांडा 1,800, उबेरेट्स 2,000 शिवाय, इतर प्लॅटफॉर्मवरील 200 रेस्टॉरंट्स ना कपन्यांनी आपल्या यादीमधून वगळले आहे.  या सर्व रेस्टॉरंट्सना नोटीस पाठवण्यात आली असून त्यांच्या उत्तरानंतर कारवाई केली जाईल, अशी माहिती FSSAIच्या अधिकाऱ्यांनी दिली.