विधानसभा निवडणूक : 100 हून अधिक मतदार असलेले जगातील सर्वात मोठे कुटुंब मतदानाचा हक्क बजावणार
चाना कुटुंब (Photo credit : youtube)

Mizoram Assembly Election : निवडणुकीच्या रिंगणात अगदी बोटावर मोजता येईल इतक्या मतांनी संपूर्ण निवडणुकीचे चित्र पालटलेले दिसते. त्यामुळे अगदी 1-2 मतांसाठीही उमेदवार लोकांच्या घरांचे उंबरे झिजवताना दिसतात. मतदारांना खुश ठेवण्यासाठी विविध प्रलोभने दाखवली जातात. वेळप्रसंगी पैसेही खाऊ घातले जातात. मात्र अशी एक-दोन नाही तर तब्बल 100 हून अधिक मते एकाच कुटुंबात असतील तर? या कुटुंबाला खुश ठेवण्यासाठी त्या उमेदवारांची अगदी त्रेधा उडत असेल. होय हे कुटुंब आहे मिझोरम राज्यातील चाना कुटुंब. जवळजवळ 200 हून अधिक सदस्य असलेल्या या कुटुंबातील तब्बल 100 लोक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यातील सरासरी 19,204 मतदारांमध्ये या 100 मतदारांचे अनन्यसाधारण महत्व आहे.

उद्या (28 नोव्हेंबर) ला मिझोरम राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election) पार पडणार आहेत. मिझोरममधील सर्वात मोठे चाना कुटुंब या मतदानास सज्ज झाले आहे. मिझोरम राज्यात, जिथे केवळ काही मतांनीच हार-जितीचा निर्णय लागतो, तिथे एकाच घरात 100 मते असलेल्या चाना कुटुंबाचे महत्त्व फार मोठे आहे. त्यामुळेच या कुटुंबाची मर्जी राखण्यास उमेदवारांची या कुटुंबात नेहमीच ये-जा राहते. मिझोरममध्ये 40 जागांसाठी एकाचवेळी हे मतदान होणार आहे. मिझोरम हे पूर्वोत्तर असे एकाच राज्य आहे जिथे कॉंग्रेसची सत्ता आहे. 2013च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने तब्बल 34 जागांवर आपला हक्क प्रस्थापित केला होता. यावर्षीच्या या निवडणुकीत 40 जागांसाठी 209 उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे साहजिकच या निवडणुकीची संपूर्ण बाजीच बदलून टाकण्याची शक्ती या चाना कुटुंबात आहे.

चाना कुटुंब हे जगातील सर्वात मोठे कुटुंब म्हणून ओळखले जाते. जिओना चाना हे या परिवाराचे प्रमुख असून त्यांना 39 पत्नी आहेत. याशिवाय 94 मुले, 14 सूना, 33 नातवंडे आणि एक लहान पणतू असे हे कुटुंब आजही एका छताखाली राहते. या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी घरात तब्बल 100 खोल्या बांधण्यात आल्या आहेत. चाना कुटुंबीयांना एका दिवसाचे भोजन तयार करण्यासाठी जवळपास 40 किलो तांदूळ, 40 कोंबड्या, 24 किलो दाळ, 50 किलो भाज्या इत्यादी साहित्याची गरज भासते. एवढेच नाही या कुटुंबाच्या एका दिवसाच्या मांसाहारासाठी 10 बोकड कापले जातात. जिओना चाना हे शिस्तप्रिय असून त्यांनी घरातील प्रत्येकाला काम वाटून दिले आहे.