Women Sub-inspector shot dead in Delhi (PC -ANI)

आज दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. परंतु, शुक्रवारी रात्री दिल्लीमध्ये एका महिला पोलिस उपनिरिक्षकेची (Women Sub-Inspector) गोळी घालून हत्या (Murder) करण्यात आली आहे. या घटनेमुळे दिल्लीमध्ये एकच खळबळ उडाली. दिल्लीतील रोहिणी परिसरात (Rohini Area) शुक्रवारी रात्री 9.30 वाजता ही धक्कादायक घटना घडली. प्रीती असं या महिला सब-इन्सपेक्टरचं नाव आहे.

प्रीती ही दिल्लीतील पटपडंगंज इंडस्ट्रियल भागात तैनात होती. शुक्रवारी रात्री ती आपली ड्यूटी पूर्ण करून रोहिणी मेट्रो स्टेशनवर पोहोचली. त्यानंतर मेट्रो स्टेशनहून आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. स्टेशनपासून 50 मीटर अंतरावर असताना एका अज्ञात तरुणाने प्रीतीवर 3 गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी प्रीतीच्या जवळून जाणाऱ्या कारच्या आरशावर लागली. तसेच एक गोळी प्रीतीच्या डोक्याला लागली आणि तिचा जागेवरच मृत्यू झाला. प्रीतीवर गोळीबार करणाऱ्या तरुणाने लागलीच घटनास्थळावरून पळ काढला. (हेही वाचा - Delhi Election 2020: दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान; आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपा पक्षाची प्रतिष्ठा पणाला)

दरम्यान, घटनास्थळावरील एका व्यक्तीने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातचं पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दिल्ली पोलिसातील उपनिरिक्षक दीपांशू यांनी प्रीतीवर गोळी झाडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. कारण दीपांशू यांनी याच पिस्तूलाने स्वत:वर गोळी झाडली आहे. कर्नाल येथील एका गाडीत त्यांचा मृतदेह सापडला आहे. प्रीती आणि दीपांशू 2018 मध्ये दिल्ली पोलिसात रुजू झाले होते. हे दोघेही बॅचमेट होते. सध्या दिल्ली पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.