सॅनिटरी पॅड मधून 3 कोटीच्या ड्रग्जची तस्करी करताना महिलेला अटक; भारत-कतार स्मगलिंग रॅकेटचा पर्दाफाश
Represerntational Image (Photo credits: stevepb/Pixabay)

कर्नाटकची राजधानी बंगळूरू (Bengaluru) येथे, एका महिलेला चक्क सॅनिटरी पॅडमधून (Sanitary Pads) ड्रग्ज (Drugs) लपवून घेऊन जात असताना पकडले आहे. ही महिला बंगळूरूवरून दोहाला जाण्याची तयारीत असताना, या ड्रग्जची तस्करी करताना ताब्यात घेतले आहे. केम्पगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (Kempegowda International Airport) च्या पार्किंग लॉट येथे ही महिला ड्रग्जसह पोलीसांना सापडली. या महिलेसोबत असणाऱ्या अजून तीन लोकांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांना नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने ड्रग्ज तस्करी विभागामध्ये चौकशीसाठी पाठविले आहे.

या महिलेसह पकडलेल्या इतर दोन व्यक्तींची नावे अबू आणि मोहम्मद अशी आहेत. दोघांचे वय 20 च्या आसपास असावे असा अंदाज आहे. हे दोघेही केरळचे रहिवासी आहेत. हे सर्व मिळून बंगळूरू येथून, भारत-कतार असे ड्रग्ज स्मगलिंग रॅकेट चालवत होते. या ड्रज्गची एकूण किंमत 3 कोटी रुपये इतकी आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक  आठवड्यापूर्वी याबाबत त्यांना माहिती मिळाली होती. त्यानंतर चौकशी सुरु केल्यानंतर शनिवारी या चौघांच्या गँगला पकडण्यात आले. (हेही वाचा: मुंबईमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरियन टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई; डोंगरी पोलिसांचे यश)

या महिलेकडून एकूण 510 ग्राम मेथाम्फेटामिन आणि 572 लिरिका कॅप्सूल जप्त करण्यात आले. मेथाम्फेटामिनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 20 लाख रुपये आहे. ड्रग्ज एजंटने या लोकांना चांगले पैसे आणि विनामूल्य हवाई प्रवासाचे आमिष दाखवून काम करण्यास प्रवृत्त केले होते. पकडलेल्या इतर युवकांच्या घरापासून चार महिन्यांपूर्वीच मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.