Madhya Pradesh: घरात घुसून बलात्कार करणाऱ्या नराधमाचे पीडित महिलेने विळ्याने कापले गुप्तांग
Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील उमरीहा गावात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने तिच्या घरात प्रवेश करून बलात्कार करणाऱ्या नराधमाचे विळ्याने गुप्तांग कापल्याची बाब समोर आली आहे. संबंधित आरोपी पीडित महिलेच्या घरात घुसून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करण्याता प्रयत्न करत होता. त्यानंतर महिलेने स्वत: च्या संरक्षणासाठी या व्यक्तीचे विळ्याच्या साहाय्याने गुप्तांग कापले.

सिधी जिल्ह्यातील खड्डी पोलिस चौकी प्रभारी सब इन्स्पेक्टर धर्मेंद्रसिंग राजपूत यांनी सांगितले की, रमेश साकेत (वय 45) यांने गुरुवारी रात्री 11 वाजता महिलेच्या घरात प्रवेश केला आणि तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. पीडित महिलेने या व्यक्तीला विरोध केला असता, रमेश साकेत याने पीडितेला मारहाण करण्यास सुरुवात केली. (वाचा -Jalandhar: पत्रिकेतील 'मंगळ' घालवण्यासाठी शिक्षिकेने केले 13 वर्षांच्या विद्यार्थ्याशी लग्न; साजरी केली लग्नाची पहिली रात्र, तक्रार दाखल)

पीडित महिलेच्या विरोधानंतरही आरोपी तिच्यावर जबरजस्ती करत होता. त्यानंतर महिलेने घरातील विळ्याच्या साहाय्याने आरोपीचे गुप्तांग कापले. या सर्व घटनेनंतर पीडितेने पोलिस स्टेशन गाठलं आणि यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला सेमारिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तेथून त्याला जिल्हा रुग्णालयात आणि नंतर संजय गांधी वैद्यकीय महाविद्यालय, रीवा येथे पाठविण्यात आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीविरोधात आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडित महिलेविरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणात सखोल चौकशी करत आहेत.