अयोध्यत राम मंदिर उभारणीसाठी प्रत्येक घरातून 1 वीट आणि 11 रुपये द्यावेत; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आवाहन
Chief Minister Yogi Adityanath (PC- ANI)

रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादावर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात ऐतिहासिक निकाल दिला. त्यामुळे आता अयोध्येत राम मंदिर (Ram Temple) उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यासाठी प्रत्येक घरातून 11 रुपये आणि 1 वीट, असं योगदान द्यावं, असं आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) यांनी जनतेला केलं आहे. योगी झारंखडमधील निवडणूक प्रचारसभेत बोलत होते. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे वर्षांपासून सुरू असलेला राम जन्मभूमीचा वाद सोडवला. काँग्रेस तसेच इतर पक्षांनी हा वाद सोडवण्यासाठी प्रयत्न केला नाही, असा आरोपही यावेळी योगी यांनी केला.

दरम्यान, योगी आदित्यनाथ म्हणाले की, झारखंडमधील प्रत्येक नागरिकाला मी आवाहन करतो की, राम मंदिर उभारणीसाठी प्रत्येक घरातून 1 वीट आणि 11 रुपये द्यावेत. मी प्रभू रामाच्या प्रदेशातून वास्तव्य करतो. त्याठिकाणचे शासन रामराज्य म्हणून ओळखले जाते. या रामराज्यात गरीब, युवक, महिला आणि समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचे काम केले जाते, असंही योगी यावेळी म्हणाले. (हेही वाचा - दिल्ली: भारत बचाओ रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस करणार रामलीला मैदानात जोरदार आंदोलन)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता नागरिकत्व सुधारणा विधेयकावर काम करत आहेत. या विधेयकामुळे शीख, बौद्ध, इसाई आणि पारसी या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यात येणार आहे. या लोकांना त्यांच्या देशात छळाला सामोरे जावे लागते. त्यामुळे नरेंद्र मोदी यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत. परंतु, काँग्रेस या विधेयकाला विरोध करत आहे, असंही योगींनी यावेळी सांगितलं.