केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे आहेत या आलिशान गाड्या, घ्या जाणून..
Prakash Javadekar Luxurious Car | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

अनेक खेळाडू, अभिनेते यांच्याप्रमाणे राजकीय नेत्यांमध्येही आलिशान आणि तितक्याच महागड्या गाड्यांची क्रेझ पाहायला मिळते. मात्र, खेळाडू, अभिनेते यांच्याप्रमाणे हे राजकीय नेते आपल्या छंदांचे फारसे प्रदर्शन करताना दिसत नाहीत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांच्याकडेही काही आलिशान गाड्या आहेत. पण, ते त्याचे प्रदर्शन कधीच करत नाहीत. संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवार (18 नोव्हेंबर 2019) पासून सुरु झाले. या अधिवेशनासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे सुद्धा दाखल झाले. या वेळी प्रकाश जावडेकर यांच्या कारने (Prakash Javadekar Luxurious Car) सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जावडेकर यांच्याकडे अशी केवळ एकच नव्हे तर इतरही काही गाड्या आहेत. जाणून घेऊया या गाड्यांबाबत.

पुणे शहरातून येणारे प्रकाश जावडेकर हे भाजपचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांच्याकडे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे. 28 फेब्रुवारी 2018 मध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या एकूण संपत्तीचा तपशील दिला होता. त्यात त्यांनी आपल्याकडे तीन कार असल्याचे म्हटले होते.

जावडेकर यांच्याकडे दक्षिण कोरियाची ऑटो निर्माता कंपनी Hyundai ची Kona एसयूवी आहे. ही एक इलेक्ट्रिक कार आहे. दरम्यान, जावडेकर यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 40 लाख रुपये किमतीची होंडा कार आहे. महत्त्वाचे म्हणजे होंडा कंपनीची भारतातील सर्वात महागडी कार एकॉर्ड हाइब्रिड म्हणून ओळखली जाते. होंडा एकॉर्ड हाइब्रिड कार किंमत 43 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. प्रतित्रापत्रात जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नीकडेही दोन गाड्या आहेत. त्यापैकी एक आई10 कारची किंमत पावणेचार लाख रुपयांच्या आसापास आहे. तर, दुसरी मर्सिडीज आहे. या कारची किंमत पावणे 23 लाख असल्याचे समजते. (हेही वाचा, १०० कोटींच्या कारमधून प्रवास करतात मिस्टर बीन !)

एएनआय ट्विट

Hyundai Kona Electric कार फिचर्स

Hyundai Kona ही इलेक्ट्रिक कार आहे. ती DC फास्ट चार्जरच्या माध्यमातून केवळ 57 मनिटांमध्ये 80 टक्के चार्ज होते. तर AC लेवल दोन चार्जर्सनी ही कार 6 तास 10 मिनिटांत पूर्ण चार्ज होते. Hyundai कंपनीने kona ही कार 9 जुलै रोजी लॉन्च केली होती. त्या वेळी त्या कारची एका शोरुममध्ये सांगितली जाणारी किंमत 25.30 लाख रुपये इतकी सांगीतली जात होती. मात्र, आता GST कमी झाल्यांनंतर या कारची किंमत 23.27 लाखांवर पोहोचली आहे.