Cyrus Mistry Accident Reason: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा रस्ता अपघातात (Accident) मृत्यू झाल्याचे कारण आता समोर आले आहे. अपघातात गंभीर जखमी झालेला सहप्रवासी दारियस पांडोळे (Darius Pandole) यांनी अपघातामागचे नेमके कारण पोलिसांना सांगितले आहे. दारियस पांडोळे यांना सुमारे दीड महिन्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी मंगळवारी त्यांचा जबाब नोंदवला आहे. दारियस पांडोळे यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले की, अपघात झाला त्यावेळी त्यांची पत्नी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अनाहिता पांडोळे (Anahita Pandole) कार चालवत होत्या. ते तिच्यासोबत पुढच्या सीटवर बसले होते. सायरस मिस्त्री आणि त्यांचा भाऊ जहांगीर पांडोळे मागच्या सीटवर बसले होते. मर्सिडीज बेंझ कारमधून ते गुजरातहून महाराष्ट्रात परतत होते. मंगळवारी दरियास पांडोळे यांनी पालघर येथील कासा पोलीस ठाण्याच्या पोलिसांना सांगितले की, त्यांची पत्नी अनाहिता पांडोळे ही सूर्या नदीच्या पुलाजवळ तिसर्या लेनमध्ये कार चालवत असताना हा अपघात झाला. तिथे रस्ता अरुंद असल्याने त्याची पत्नी लेन बदलू शकली नाही. त्यावेळी दुसऱ्या लेनमध्ये अवजड वाहनही जात असल्याने लेन बदलायला जागा नव्हती.
लेन बदलता न आल्याने कार सूर्या नदीच्या पुलावरील रेलिंगला जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, वाहनाचे मोठे नुकसान झाले. मर्सिडीज कारमधील सर्व एअर बॅग उघडल्या. या अपघातात सायरस मिस्त्री आणि जहांगीर पांडोळे यांचा मृत्यू झाला. तर कार चालवणारी महिला डॉ. अनाहिता पांडोळे आणि पुढच्या सीटवर बसलेले पती दारियस पांडोळे हे दोघे गंभीर जखमी झाले. (हेही वाचा - Tihar Jail DG: सुकेश चंद्रशेखर वादाच्या पार्श्वभूमीवर तिहार तुरुंगाचे डीजी Sandeep Goyal यांची बदली; Sanjay Beniwal यांना मिळाली कमान)
दरम्यान, टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि देशातील प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे 4 सप्टेंबर 2022 रोजी एका रस्ते अपघातात निधन झाले. गुजरातहून मुंबईला परतत असताना महामार्गावरील सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला. या अपघातात सायरस मिस्त्री (वय, 54) आणि मर्सिडीज कारच्या मागील सीटवर बसलेला त्यांचा मित्र जहांगीर पांडोळे यांचा मृत्यू झाला. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अनाहिता पांडोळे (वय, 55) या कार चालवत होत्या आणि त्यांचे पती दरियास पांडोळे (वय, 60) हे समोरच्या सहप्रवासी सीटवर बसले होते.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या दारियस पांडोळे यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या आठवड्यातच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरियास पांडोळे याचा जबाब त्याच्या दक्षिण मुंबईतील राहत्या घरी नोंदवण्यात आला आहे. सुमारे दीड तासांच्या निवेदनात त्यांनी अपघाताची संपूर्ण माहिती दिली आहे.
त्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांची पत्नी गुजरातहून मुंबईला परतत असताना तिसऱ्या लेनमध्ये कार चालवत होती. पुलाजवळचा रस्ता अरुंद होता. तीन पदरी रस्ता दुपदरी झाला होता. त्यांच्या कारच्या पुढे दुसरी कार जात होती. पुढे असलेल्या कारने लेन बदलल्या. ती गाडी पाहून पत्नी अनाहित पांडोळे यांनीही तिसर्या लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये गाडी आणण्याचा प्रयत्न केला. अनाहिता कार तिसऱ्या लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये नेण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या लेनमध्ये तिला उजव्या बाजूला एक ट्रक दिसला. त्यामुळे तिला लेन बदलता आली नाही. त्यामुळे त्यांची कार सूर्या नदीच्या अरुंद पुलावरील रेलिंगला धडकली.
पालघरचे एसपी बाळासाहेब पाटील यांनी सायरस मिस्त्री यांचे सहप्रवासी दरियास पांडोळे यांच्या जबाब नोंदवल्याला दुजोरा दिला आहे. अपघाताच्या वेळी कार चालवत असलेल्या दरियास पांडोळे यांच्या पत्नी डॉ. अनाहिता पांडोळे यांचा जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाही, असे एसपींनी सांगितले. त्या अजूनही रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर मर्सिडीज बेंझच्या तज्ज्ञांनीही अपघाताची कारणे जाणून घेण्यासाठी तपास केला. मर्सिडीज बेंझचा अंतिम तपास अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.