Coronavirus Vaccine प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: Flickr)

Coronavirus Vaccine: भारत बायोटेक (Bharat Biotech) या फार्मा कंपनीने विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी COVAXIN लसीची आज मानवी चाचणी करण्यात आली आहे. दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयातील एका 30 वर्षीय स्वयंसेवकाला या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. COVAXIN लसीचा डोस देण्यात येणाऱ्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. यासंदर्भात इंडिया टुडे या इंग्रजी वेबसाईटने वृत्त दिलं आहे.

प्राप्त माहितीनुसार, या तरुणावर पुढील 7 दिवस लक्ष ठेवण्यात येणार आहे. COVAXIN लसीची मानवी चाचणी करण्यासाठी अनेक स्वयंसेवकांनी तयारी दर्शवली होती. मात्र, यात एका 30 वर्षीय तरुणाची निवड करण्यात आली. (हेही वाचा - देशातील COVID-19 चा रिकव्हरी रेट 63.45% तर मृत्यूदर 2.3% - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती)

दरम्यान, हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीकडून COVAXIN लस तयार करण्यात आली आहे. कोरोनावरील लस काढण्यासाठी भारत बायोटेकसोबत आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी यांचा करार झाला आहे. या कंपनीला केंद्रीय औषध नियंत्रण विभागाकडून मानवी चाचणी घेण्यासाठी परवानगी मिळाली होती. त्यानुसार, आज 30 वर्षीय तरुणावर चाचणी घेण्यात आली आहे.

COVAXIN लसीच्या पहिल्या टप्प्यात 375 जणांवर प्रयोग करण्यात येणार आहे. यात दिल्लीतील एम्स रुग्णालयातील 100 जणांचादेखील समावेश असणार आहे. COVAXIN लसीची मानवी चाचणी करण्यासाठी स्वयंसेवकांना आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाला तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला. यातील चाचणीसाठी योग्य ठरलेल्या व्यक्तीची निवड करण्यात आली.