Hathras Case: हाथरस सामूहिक बलात्कार-हत्येप्रकरणी सीबीआय, ईडी आणि एसआयटीच्या चौकशीदरम्यान पीडितेचे कुटुंब पुन्हा एकदा गाव सोडण्याचा विचार करत आहेत. पीडितेच्या परिवाराला गाव सोडून दिल्लीमध्ये वास्तव्यास जायचं आहे. यासाठी त्यांना शासनाची मदत हवी आहे. यापूर्वीदेखील पीडितेच्या कुटुंबियांनी भीतीमुळे गाव सोडणार असल्याचं म्हटलं होतं. यासंदर्भात बोलताना पीडितेचा भाऊ म्हणाला की, "आम्हाला गावात राहायचे नाही. आमचा खटला दिल्लीला वर्ग करावा. सुरक्षेसाठी आणि रोजगारासाठी या कुटुंबालाही दिल्लीला जायचे आहे. दिल्लीत केस ट्रान्सफर झाल्यास आम्ही तिथे जाऊन भाड्याच्या घरात राहू. आम्ही घटनेसंदर्भातील सर्व गोष्टी सीबीआयला सांगितल्या आहेत. अद्याप सीबीआयची आई आणि वहिणीसोबत चर्चा होणं बाकी आहे."
पीडितेचा मोठा भाऊ म्हणाला की, 'एवढे सगळं झालं असताना आम्ही इथं राहणं अशक्य आहे. जर सरकारने आम्हाला दिल्लीत जाण्यास मदत केली तर खूप मोठी मदत होईल. आम्हाला नव्याने सुरुवात करायची आहे. सध्या आम्हाला पोलिस सुरक्षा आहे. पण यापुढे ती नेहमीच असणार नाही,' असंही पीडितेच्या भावाने सांगितलं आहे. (हेही वाचा -Haryana Shocker: मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचं सांगत पतीने पत्नीला दीड वर्षांपासून शौचालयात कोंडलं; पोलिसांनी केली सुटका)
दरम्यान,12 ऑक्टोबर रोजी पीडितेच्या कुटूंबाने हे प्रकरण उत्तर प्रदेशातून दिल्ली येथे हलविण्याची मागणी हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठासमोर केली होती. पीडितेच्या धाकट्या भावाने सांगितले की, "हा आमच्यासाठी एक कठीण निर्णय असेल. आमची ओळख या गावाशी संबंधित आहे. आम्ही येथे जन्मलो आणि इथेच वाढलो. आमच्या अनेक पिढ्या या गावात राहिल्या आहेत. आमच्याकडे या गावातल्या बर्याच चांगल्या आठवणी आहेत.
मात्र,एका वाईट दुर्घटनेने सर्व काही विस्कळीत झालं आहे. इथे राहिल्यामुळे आम्हाला आमच्या बहिणीचे काय झाले ते दररोज लक्षात येईल,' असंही पीडितेच्या भावाने म्हटलं आहे. सध्या या प्रकरणाचा खटला हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठात सुरू आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे.