Air India New Chairman: टाटा सन्स (Tata Sons)चे प्रमुख नटराजन चंद्रशेखरन (Natarajan Chandrasekaran) यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी (Air India New Chairman) नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा समूहाच्या बोर्डाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत एन. चंद्रशेखरन यांच्या एअर इंडियाच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले. टाटा सन्सने नुकतेचं एअर इंडिया विकत घेतले होते. तेव्हापासून यासाठी प्रमुखाचा शोध सुरू होता. मात्र, आता या सर्वोच्च पदावरील नियुक्तीला संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
यासोबतच अहवालात म्हटले आहे की, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे माजी सीएमडी, अॅलिस गीवर्गीस वैद्य यांना देखील बोर्डावर स्वतंत्र संचालक म्हणून समाविष्ट केले जाईल. टाटा सन्समध्ये 69 वर्षांनंतर परत आल्यानंतर म्हणजेच एअर इंडिया ताब्यात घेतल्यानंतर अध्यक्षपदाचा शोध जोरात सुरू होता. दरम्यान, अध्यक्षपदी तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष इल्कर अयासी यांच्या नावाची निवड करण्यात आली. परंतु, त्यांनी एअर इंडियाचे सीईओ होण्यास नकार दिला. (वाचा - भाजपने 4 राज्यांमध्ये केली केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती; Amit Shah यांना देण्यात आली उत्तर प्रदेशची जबाबदारी)
कोण आहेत नटराजन चंद्रशेखरन?
एन. चंद्रशेखरन यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) येथून एमसीए केले आहे. 1987 मध्ये ते पहिल्यांदा टाटा समूहाशी जोडले गेले. टाटा समूहाच्या सर्वात मोठी कंपनी होण्याच्या प्रवासात चंद्रशेखरन यांचीही महत्त्वाची भूमिका मानली जाते. चंद्रशेखरन यांचा जन्म 1963 मध्ये तामिळनाडूमध्ये झाला. त्यांना चंद्र या नावानेही संबोधले जाते. चंद्रा यांचा ऑक्टोबर 2016 मध्ये टाटा सन्सच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला होता. ते टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर आणि टीसीएस सारख्या कंपन्यांच्या बोर्डाचेदेखील अध्यक्ष आहेत.
टाटा सन्स बोर्डाने अलीकडेच एन चंद्रशेखरन यांचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यकाळ आणखी पाच वर्षांसाठी वाढवला होता. मंडळाने गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेताना त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यासाठी टाटा सन्सच्या बोर्डाच्या बैठकीत टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा देखील उपस्थित होते. त्यांनी एन चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाच्या प्रगती आणि कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. रतन टाटा यांच्यासह बोर्ड सदस्यांनी एन चंद्रशेखरन यांच्या कार्याध्यक्षपदाच्या कार्यकाळाचे कौतुक केले आणि पुढील पाच वर्षांसाठी त्यांची पुनर्नियुक्ती मंजूर केली.