भाजपने 4 राज्यांमध्ये केली केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती; Amit Shah यांना देण्यात आली उत्तर प्रदेशची जबाबदारी
Amit Shah (PC - PTI)

विधानसभा निवडणुकीत चार राज्यांतील विजयानंतर भाजपने आता सरकार स्थापनेची तयारी जोरात सुरू केली आहे. पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत पंजाब वगळता इतर सर्व राज्ये भाजपच्या ताब्यात आली आहेत. भाजपने उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच गोव्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

अमित शहा यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी -

आता भाजपने या राज्यांमध्ये सरकार स्थापनेसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी केंद्रीय नेते राज्यांमध्ये पाठवले जाणार असून मंत्र्यांच्या नावावरही चर्चा होऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि रघुवर दास यांना यूपीसाठी निरीक्षक बनवण्यात आले आहे. (वाचा - Budget Session 2022: भाजपच्या चार राज्यातील विधानसभाच्या विजयानंतर लोकसभेत भाजपच्या खासदारांकडून 'मोदी...मोदी'च्या घोषणा)

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मीनाक्षी लेखी यांची उत्तराखंडमध्ये निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मणिपूरमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू निरीक्षक म्हणून जाणार आहेत. नरेंद्र सिंह तोमर आणि एल मुरुगन यांना गोव्यात निरीक्षक बनवण्यात आले आहे. या सर्व राज्यांमध्ये गोवा हे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण 40 सदस्यांच्या विधानसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. पण 20 जागांसह भाजप नक्कीच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, चार दिवस उलटले तरी भाजपने अद्याप सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. निवडणुकीत 40 सदस्यांच्या विधानसभेत भाजपने सर्वाधिक 20 जागा जिंकल्या होत्या. तीन अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन सदस्यांनी आधीच भाजपला पाठिंबा दिल्याने भाजप सहज सरकार स्थापन करू शकतो.