
Bihar: बिहारच्या सुपौलमधून (Supaul) दिल्लीतील बुराडीसारखे प्रकरण समोर आले असून एकाच कुटुंबातील 5 जणांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. ज्यात पती-पत्नीसह त्यांच्या 3 मुलांचा समावेश आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या कुटुंबातील पाच जणांचा मृतदेह गळफास घेतलेल्या संशयास्पद स्थितीत आढळला. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. राघोपूर पोलिस स्टेशन परिसरातील गद्दी वॉर्ड चारमध्ये राहणारे पती-पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांची गर्दी जमली होती. या आत्महत्या प्रकरणानंतर नागरिकांमध्ये विविध प्रकारची चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राघोपूर पंचायतीच्या गद्दी प्रभाग 12 मधील मिश्री लाल साह (50) यांच्या घरातून दुर्गंधी आल्यानंतर ग्रामस्थांनी यासंदर्भात गावातील मुखियाला माहिती दिली. यानंतर ग्रामसेवकासह नागरिकांनी घरात घुसून बाहेरील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी घरातली एक खोली आतून बंद होती. लोकांनी खिडकीतून पाहिले, तेव्हा त्यांना पाच जणांचे मृतदेह लटकलेले दिसले. (वाचा - राजस्थान: काळा रंग असल्याचे म्हणत बायकोने सोडले, नवऱ्याची कोर्टात धाव)
दरम्यान, मृतांमध्ये मिश्रीलाल साह, त्याची पत्नी रेणू देवी, त्यांच्या दोन अल्पवयीन मुली आणि एक मुलगा यांचा समावेश आहे. लोकांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. घटनेनंतर एसपी मनोज कुमार, प्रशिक्षणार्थी डीएसपी स्टेशन हेड सुशांत कुमार चंचल आणि डीएसपी रामानंद कौशल घटनास्थळी दाखळ झाले. त्यांनी नागरिकांकडून संबंधित घटनेची माहिती घेतली.
अद्याप या सामूहिक आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेने नाही. या घटनेचा तापस करण्यासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी येणार आहे. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही सामूहिक आत्महत्या आहे की, दुसरे काही हे तपासणी व फॉरेन्सिक रिपोर्टनंतरच सांगता येईल.