Violence At Allahabad University: सोमवारी दुपारी प्रयागराज येथील अलाहाबाद विद्यापीठाच्या (Allahabad University) कॅम्पसमध्ये विद्यार्थी संघटनेची अचानक गर्दी झाली. विद्यापीठ परिसरात जमलेल्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. संताप व्यक्त करत विद्यार्थ्यांनी जोरदार तोडफोड आणि जाळपोळ केल्याचा प्रकार घडला आहे. विद्यापीठाच्या गेटवर तैनात असलेल्या गार्डने गोळीबार केल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
विद्यार्थ्यांची सुट्टी असतानाही विद्यार्थ्यांनी विद्यार्थी संघटनेच्या इमारतीचे कुलूप उघडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान विद्यापीठात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. (हेही वाचा - तेलंगणातील Sangareddy मध्ये Hetero Pharma Unit मध्ये घुसला बिबट्या; कर्मचार्यांची उडाली घाबरगुंडी (Watch Videos))
विद्यार्थ्यांनी केली दगडफेक -
विद्यार्थ्यांमधील अभिषेक आणि हरेंद्र यादव यांनी सुरक्षारक्षकांनी गोळीबार केल्याचा आरोप केला. यानंतर सर्व विद्यार्थी संतप्त झाले आणि प्रचंड गोंधळ झाला. सर्व वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात गर्दी केली आणि दगडफेकही केली.
दुसरीकडे, माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा पोहोचला आणि त्यांनी परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली. या प्रकरणातील तणावाचे गांभीर्य पाहून पोलीस आयुक्त रमेश शर्मा व इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या दगडफेकीत विद्यार्थी नेते विवेकानंद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, मात्र त्यांनी दगडफेक करण्याऐवजी शांतता मोर्चा काढण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले.
विद्यार्थी नियंत्रणाबाहेर -
विद्यार्थ्यांचा रोष नियंत्रणाबाहेर गेला होता. संताप व्यक्त करत विद्यार्थ्यांनी मुख्य प्रॉक्टर कार्यालयाचा घेराव केला. यावेळी प्रॉक्टर कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत विद्यार्थ्यांनी खुर्च्या फोडल्या आणि दगडफेकही केली. यावेळी दोन दुचाकी पेटवून देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी डझनभर गाड्यांच्या काचाही फोडल्या.
Brawl between students and security personnel at Allahabad University led to violence, arson and vandalism in the varsity campus. The violent confrontation sparked after a student leader was allegedly attacked by the security guards. pic.twitter.com/HKgUFDCnC3
— Piyush Rai (@Benarasiyaa) December 19, 2022
सर्व विद्यार्थी नंतर स्टुडंट्स युनियनच्या इमारतीत परतले, पण त्यादरम्यानही त्यांनी दगडफेक सुरूच ठेवली. सायंकाळी 5 वाजता परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर जखमी विद्यार्थी नेते विवेकानंद यांनी डीएम आणि पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी त्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली.