Shiv Sena Leader Sudhir Suri Shot Dead (PC - ANI)

Shiv Sena Leader Sudhir Suri Shot Dead: शिवसेना नेते सुधीर सुरी (Sudhir Suri) यांची शुक्रवारी दुपारी पंजाबमधील अमृतसर (Amritsar) मध्ये सार्वजनिकरित्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. देवतांच्या तुटलेल्या मूर्ती काही लोकांनी गोपाळ मंदिराबाहेर फेकल्या. ही बाब सुरी यांना कळताच ते मंदिराबाहेर पोहोचले आणि मूर्तींची विटंबना करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी धरणे धरले. त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि समर्थकही होते. यादरम्यान अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला.

सुधीर सुरी यांच्या छातीत गोळ्या लागल्या. त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनीही हवेत गोळीबार केला. घटनास्थळी गोंधळ उडाला. जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराचा पाठलाग करून त्याला आधी मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यात किती हल्लेखोर होते हे अद्याप समजू शकलेले नाही. (हेही वाचा - Delhi MCD Election 2022 Date: दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठी 4 डिसेंबरला होणार मतदान; 7 तारखेला लागणार निकाल)

शिवसेना नेते सुधीर सुरी यांना गेल्या अनेक वर्षांपासून खलिस्तानी दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने पंजाब पोलिसांचे सुरक्षा कर्मचारी त्यांच्या संरक्षणात तैनात केले होते. आता गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा शिवसेना नेते सुरी यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शनिवारी अमृतसरला लागून असलेल्या डेरा ब्यासमध्ये येत आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी घडलेल्या या घटनेने सुरक्षा यंत्रणांची झोप उडवली आहे. मोदींच्या या दौऱ्याला शेतकरी संघटनांनी आधीच विरोध जाहीर केला असून आता हिंदू नेत्याच्या हत्येमुळे सुरक्षा यंत्रणांच्या अडचणीत भर पडली आहे.

भाजप-काँग्रेसचा हल्लाबोल - 

गोळीबाराच्या या घटनेनंतर भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजप नेते तजिंदर सिंग बग्गा यांनी आम आदमी पार्टी सरकारवर निशाणा साधत पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी काँग्रेसचे श्रीनिवास यांनी ट्विट करून पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती असल्याचे म्हटले आहे. अमृतसरमध्ये एका स्थानिक शिवसेना नेत्याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली.