Mallikarjun Kharge and Shashi Tharoor (PC - PTI)

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज मागे घेण्याची आज 8 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्यात काँग्रेस अध्यक्ष पदासाठी लढत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीत हे दोनच उमेदवार आहेत. के.एन.त्रिपाठी यांचे उमेदवारी अर्ज यापूर्वीच रद्द करण्यात आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याचे शशी थरूर यांनी आधीच सांगितले आहे. शशी थरूर म्हणाले की, मी काँग्रेस कार्यकर्त्यांची फसवणूक करणार नाही.

एबीपी न्यूजशी खास संवाद साधताना शशी थरूर म्हणाले होते, 'ज्यांनी माझ्यासाठी सर्वस्व पणाला लावले त्यांचा मी कधीही विश्वासघात करणार नाही. मी त्यांना कधीही निराश करणार नाही. अध्यक्षपदाच्या या शर्यतीत मी स्वतःसाठी नाही, तर काँग्रेसच्या त्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी आहे ज्यांनी माझ्याशी संपर्क साधून मला ही निवडणूक लढवण्याची विनंती केली आहे.' शशी थरूर सध्या चेन्नईत प्रचार करताना दिसणार आहेत. (हेही वाचा - PFI Threat Letter: पीएफआयच्या ब्लॅकलिस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहसह राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा समावेश; PFI च्या कार्यकर्त्याकडून धक्कादायक पत्र)

मल्लिकार्जुन खरगे निवडणूक प्रचारात व्यस्त -

शशी थरूर यांच्याप्रमाणेच मल्लिकार्जुन खर्गेही आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याचे म्हणत आहेत. त्यांनी 7 ऑक्टोबरपासून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. अहमदाबादमधून प्रचाराला सुरुवात करणारे मल्लिकार्जुन खरगे मुंबईलाही भेट देणार आहेत. यानंतर ते तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, खरगे येत्या पाच दिवसांत किमान 10 राज्यांच्या राजधान्यांना भेट देतील. तसेच राज्यातील कार्यकर्त्यांना भेटून त्यांचा पाठिंबा घेणार आहे.

17 ऑक्टोबरला होणार मतदान -

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत रोमांचक होत आहे. यापूर्वी या शर्यतीत अनेक नावे होती. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे अध्यक्षपद जवळपास निश्चित झाले होते, मात्र जयपूरमधील राजकीय घडामोडीने सर्व समीकरणे बदलून टाकली. आता शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खरगे या शर्यतीत आहेत. अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दोन उमेदवार रिंगणात असतानाच हे मतदान होणार आहे. एकच उमेदवार उभा राहिला तर तो बिनविरोध निवडून येईल.