काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धारमैया, माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
Siddaramaiah, HD Kumaraswamy (PC- PTI)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धारमैया, (Senior Congress leader Siddaramaiah) माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी (Former Chief Minister HD Kumaraswamy), बंगळुरूचे तत्कालीन पोलीस आयुक्त टी. सुनीलकुमार व अन्य पोलीस अधिकारी तसेच काही काँग्रेस नेते आणि जनता दल (एस) नेत्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकांच्या काळात प्राप्तिकर खात्याच्या धाडींविरोधात निदर्शने केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा - कर्नाटक माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी पक्षातील कार्यकर्त्याला मीडियासमोर कानशीलात लगावली, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल) मल्लिकार्जुन ए. या कार्यकर्त्याने यासंदर्भात बंगळुरू न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. दरम्यान, न्यायालयाने निदर्शनांमध्ये समावेश असणारे नेते, अधिकारी यांच्यावर केंद्र सरकारच्या विरोधात युद्ध छेडण्याचा प्रयत्न करणे, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, अशा आरोपांखाली भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात यावा, असा आदेश पोलिसांना दिला आहे.

तसेच याप्रकरणी तत्कालीन उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर, डी.के. शिवकुमार, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव, तत्कालीन पोलीस उपायुक्त राहुलकुमार, डी. देवाराजू धाडींबद्दल प्रतिक्रिया करणारे सर्व निवडणूक अधिकारी यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी राजकीय हेतूने कारवाई केल्याचा आरोप केला आहे. या सर्व प्रकरणाला आम्ही राजकीय पद्धतीनेच उत्तर देऊ, असंही शिवकुमार यांनी सांगितलं.